कोविड रुग्णालयापेक्षा 'मॉनिटरिंग' रुग्णालय उभे करा

जयसिंग कुंभार 
Saturday, 8 August 2020

सांगली : महापालिकेने 500 खाटांचे कोविड रुग्णालय उभे करण्याचे शिवधनुष्य उचलण्यापेक्षा कोविड मॉनिटरिंग रुग्णालय उभे करावे. 

सांगली : महापालिकेने 500 खाटांचे कोविड रुग्णालय उभे करण्याचे शिवधनुष्य उचलण्यापेक्षा कोविड मॉनिटरिंग रुग्णालय उभे करावे. त्याचवेळी सध्याच्या प्रसूतिगृहात 100 खाटांच्या विशेष उपचार देणाऱ्या कोविड रुग्णालयासाठी तातडीने पाऊले टाकावीत, अशी अपेक्षा आज शहरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केली. 

सध्या कोविडच्या गंभीर अत्यवस्थ उपचारांसाठी आणि सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी अशा दोन प्रकारच्या रुग्णालयांची गरज आहे. विशेष रुग्णालय उभे करण्यातील सर्वांत मोठी अडचण तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव हीच असेल. कारण असे 50 खाटांचे हॉस्पिटल उभे करायचे म्हटले तरी 15 डॉक्‍टर आणि 60 परिचारिकांची गरज लागेल. सध्या कोविड रुग्णालये म्हणून घोषित केलेल्या रुग्णालयांनाच प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे.

अतिदक्षता विभाग हाताळण्यासाठी नेहमीचे भूलतज्ज्ञ पुरेसे ठरत नाहीत. व्हेंटिलेटर हाताळण्याचे कौशल्य असणारे तज्ज्ञ मिळत नाहीत. या घोषित रुग्णालयांमधील परिचारिका, सफाई कर्मचारीही आता सोडून जाऊ लागले आहेत. त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारण्याची वेळ जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे. तथापि, भविष्यात तातडीची गरज म्हणून ते उभे करायलाही हरकत नाही. त्या दिशेने महापालिकेने प्रयत्न करायला हरकत नाही. मात्र, 500 रुग्णालयांचा भला मोठा घास घेण्याऐवजी मॉनिटरिंग रुग्णालय सुरू करावे. 

अशा ठणठणीत असलेल्या; पण बाधित असलेल्या रुग्णांना देखरेखेखाली ठेवण्यासाठी अशा रुग्णालयांची गरज असेल. अर्थात, आता अशा रुग्णांसाठी घरातच अलगीकरणाची मुभा दिली आहे. मात्र, ज्यांच्याकडे ही सोयच नाही, अशा रुग्णांना अशा मॉनिटरिंग रुग्णालयांची गरज असेल. 

गरीब रुग्णांना बेडच मिळणार नाही, अशी वेळ कदापि येता कामा नये. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी सांगली-मिरज रस्त्यावरील वेअर हाउसमध्ये महापालिकेने मॉनिटरिंग रुग्णालय सुरू करावे. त्यामुळे सध्याच्या विशेष कोविड रुग्णालयावरील ताण कमी होईल.
- गजानन मगदूम, नगरसेवक 

महापालिकेने 500 खाटांऐवजी सध्याच्या प्रसूतिगृहाच्या इमारतीत तात्पुरते विशेष कोविड रुग्णालय सुरू करावे. त्यासाठी मनुष्यबळ कसे उपलब्ध होते, ते पाहूनच नंतर त्या रुग्णालयाचा विस्ताराचा विचार करावा. त्याआधी मॉनिटरिंग रुग्णालय सुरू करण्यासाठी तातडीने पाऊले टाकावीत.'' 
- डॉ. बिंदुसार पलंगे 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Set up a ‘monitoring’ hospital rather than Kovid Hospital