सांगलीत जम्बो कोविड रुग्णालय उभे करा, भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांची मागणी 

अजित झळके
Monday, 7 September 2020

सांगलीमध्ये दररोज सातशे ते साडेसातशे रुग्ण बाधित सापडत आहेत. सांगली जिल्ह्यातील प्रमाण हे महाराष्ट्र राज्य तसेच देशामध्ये पहिल्या नंबरवर आहे. ही बाब सांगलीसाठी निराशाजनक आहे.

सांगली ः जगभर कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशात व राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णांना उपचारासाठी प्रशस्त व सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालयाची संख्या अत्यल्प आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा कोवीड रुग्णांचा मृत्यू दर हा जागतिक मृत्यू दरापेक्षा अधिक आहे. 

सांगलीमध्ये दररोज सातशे ते साडेसातशे रुग्ण बाधित सापडत आहेत. सांगली जिल्ह्यातील प्रमाण हे महाराष्ट्र राज्य तसेच देशामध्ये पहिल्या नंबरवर आहे. ही बाब सांगलीसाठी निराशाजनक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोविड रुग्णालयांची अपूरी संख्या व त्यातील सोयी सुविधांचा अभाव. पुणे व मुंबई या शहरांमध्ये कोविड जंबो हॉस्पिटल व्हेंटीलेटरच्या उपलब्धतेसह उभे करून रुग्णांची सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी, महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पुणे व मुंबई प्रमाणे कोविड जंबो हॉस्पीटल उभे करणे गरजेचे आहे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. 

ते म्हणाले, ""कोव्हीड- जंबो हॉस्पिटल उभे केल्यास नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यास जिल्ह्याचा मृत्युदरही कमी होईल व नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी होईल. याबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा. त्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी यांना माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे, कृष्णा राठोड, अमोल कणसे, आबा जाधव यांनी निवेदन सादर केले.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Set up Jumbo Kovid Hospital in Sangli, demand of BJP MLA Sudhir Gadgil