
सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर पहिल्याच महासभेत भाजप विरुध्द दोन्ही कॉंग्रेस असा सामना रंगला. प्रभाग समिती पुनर्रचना व गुंठेवारी समितीच्या स्थापनेवरून महाविकास आघाडी व भाजपच्या नगरसेवकांत आरोप-प्रत्यारोप रंगले. मात्र यानिमित्ताने भाजपची सदस्य संख्येला ओहोटी लागल्याचेही दिसले. भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी आघाडीच्या निर्णयाचे समर्थन करीत स्वपक्षीयांना पुन्हा धक्का दिला. दरम्यान भाजपनेदेखील महापौरांनी सभेतून पळ काढल्याचा आरोप केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 41 सदस्य निवडून आले होते. तर दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अडीच वर्षे भाजपची सदस्यसंख्या 43 इतकी होती. महापौर निवडीवेळी हीच सदस्य संख्या 36 वर आली. तर महासभेत शुक्रवारी दोन्ही विषयाला भाजपने लेखी विरोध केला. त्यात एका विषयाच्या पत्रावर 31 तर दुसऱ्या पत्रावर 33 जणांच्या सह्या होत्या. या कमी सदस्यसंख्येबाबत गटनेते विनायक सिंहासने यांनी मात्र आमचे 36 सदस्य अखंड आहेत असे स्पष्ट केले. काही सदस्य बाहेरगावी असल्याने त्यांच्या स्वाक्षरी होऊ शकल्या नाहीत असे त्यांनी सांगितले.
महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्याच ऑनलाईन सभेतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य एकमेकांशी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन भिडले. सभेच्या अजेंड्यावर गुंठेवारी समिती स्थापन करण्यास मान्यतेचा विषय होता. या विषयाला भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. हा विषय घाईगडबडीत घेतला आहे. प्रशासनाचे विषयपत्रही नाही. किती जणांची समिती असेल, त्याबाबत स्पष्टता नाही, असे मुद्दे मांडत सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडूरंग कोरे यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. कॉंग्रेसचे संतोष पाटील, वहिदा नायकवडी, योगेंद्र थोरात, संगीता हारगे, अभिजित भोसले, विष्णू माने यांनी गुंठेवारी समितीचे समर्थन केले. त्यांच्यासोबत भाजपचे सदस्य आनंदा देवमाने, नसीमा नाईक यांनीही आघाडीला समर्थन देत भाजपची कोंडी केली.
भाजपच्या काही नगरसेवकांना लिंक नाही...
भाजप सदस्यांनी आधी ऑफलाईन सभेचा आग्रह धरला. त्यासाठी विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्वाती शिंदे आदी सभागृहात घुसले. त्यांनी आम्हाला ऑनलाईन सभेची लिंकच दिली नसल्याचा आक्षेप नोंदवला. प्रवेशद्वारावर काही महिला सदस्यांनी ठिय्या मारला. आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणांनी महापालिका दणाणली. सभेच्या अंतिम टप्प्यात सदस्य घुसल्याने महापौरांनी अजेंड्यावरील विषय मंजूर करत सभाच आटोपती घेतली. त्यांच्यावर सभेत पळ काढल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला.
त्या सदस्यांवर कारवाईचा इशारा
भाजपने आपल्या सत्ताकाळात प्रत्यक्ष सभेसाठी आग्रह धरला नाही. सत्ता गेल्यानंतरच त्यांना ऑफलाईन सभेची आठवण झाली आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने ऑनलाईन सभा घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नुकतेच उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. शासन आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या भाजपच्या गोंधळी सदस्यांवर कायदेशीर कारवाई करता येईल यासाठी प्रशासनाकडून अहवाल मागवला जाईल असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.