आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातीलसात पूल धोकादायक; उंची वाढविण्याची गरज

हमीद शेख
Thursday, 15 October 2020

आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मुख्य रस्त्याचे सात पूल अतिपावसाच्या पाण्यापासून धोकादायक ठरणारे आहेत.

खरसुंडी (जि . सांगली)  : आटपाडी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मुख्य रस्त्याचे सात पूल अतिपावसाच्या पाण्यापासून धोकादायक ठरणारे आहेत. वेळीच काही पुलांची उंची वाढविणे, तर काही उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्याची गरज आहे. अन्यता अतिपावसामुळे कधीही तालुक्‍यात जोडणारे मुख्य दोन रस्ते बंद होऊ शकतात.

आटपाडी तालुक्‍याची भौगोलिक रचना अशी आहे, की पश्‍चिम भागातून सर्वच ओढे-नाले निघतात आणि तालुक्‍यातून पूर्वेकडे जातात. तालुक्‍यात या प्रत्येक मोठ्या स्थानिक ओढ्यावर साठवण तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे बांधण्यात आली आहेत. पश्‍चिम भागातून जाणाऱ्या प्रत्येक ओढ्यावर पाण्याची साठवण क्षमता व भूभागानुसार प्रत्येक ठिकाणी पाणी अडविण्याचे काम झाले आहे. मात्र, टेंभू योजनेचे पाणी सात वर्षांपूर्वी आल्यापासून तालुक्‍यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक वर्षी पाऊस जास्त पडतो. यावर्षी तर आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पावसाने मोडीत काढले. 

तालुक्‍यात येणारा मुख्य रस्ता भिवघाट, आटपाडी व खरसुंडी या रस्त्यांवरील मासाळ वस्ती, भिवघाट येथील पूल तालुक्‍यात जोडणारा आहे. हा पूल फार पूर्वीचा आणि कमी उंचीचा आहे. या वेळी हा पूलही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली.

नेलकरंजी शेजारील पूल कमी उंचीचा आणि यावर पाणलोट क्षेत्र किती आहे, याचा अंदाज न घेता बांधण्यात आला. त्यामुळे तो पूल पाण्याने पुरता वाहून गेला. खरसुंडीकडे जाणारा मार्ग पूर्णच बंद झाला. आवटेवाडी- करंजवडा येथील पूल कमी पाईपलाईन व कमी उंची असल्याने थोडा जरी पाऊस जास्त झाला तर या पुलावरून पाणी वाहते आणि रस्ता बंद होतो. 

हे पूल आहेत धोकादायक 
धावडवाडी, खरसुंडी गावाशेजारील, चिंचाळे साठवण तलावाचा पूल व जांभुळणी साठवण तलावाच्या सांडव्यातून जाणाऱ्या पाण्याच्या मार्गावर बांधण्यात आलेला पूल हे अतिपावसात कधीही पाण्याखाली जाऊ शकतात. यावरून पाणी जाऊ शकते. अतिपावसामुळे या पुलांची स्थिती सर्वांनी पाहिली आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven bridges in the western part of Atpadi taluka are dangerous; The need to increase the height