सातशे कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर 

बलराज पवार
Thursday, 16 July 2020

सांगली-  कोरोनामुळे रखडलेले महापालिकेचे सन 2020-21 चे 714.90 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती संदीप आवटी यांनी आज महासभेत महापौर गीता सुतार यांच्याकडे सादर केले. प्रशासनाने फेब्रुवारीत 675 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. यात "स्थायी'ने करवाढ न करता आणखी 40 कोटींची वाढ केली.

सांगली-  कोरोनामुळे रखडलेले महापालिकेचे सन 2020-21 चे 714.90 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती संदीप आवटी यांनी आज महासभेत महापौर गीता सुतार यांच्याकडे सादर केले. प्रशासनाने फेब्रुवारीत 675 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. यात "स्थायी'ने करवाढ न करता आणखी 40 कोटींची वाढ केली. 

आयुक्त नितीन कापडणीस यांनी फेब्रुवारीत 675.24 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर कोरोना महामारीचे संकट आल्याने महासभेला अर्थसंकल्प सादर करण्यास तीन महिन्यांचा कालावधी गेला. मात्र, सभापती आवटी यांनी करवाढ न सुचविता नगरसेवकांना 25 लाखांचा निधी देत खूश केले आहे. 
सभापती आवटी म्हणाले, की महापालिकेस गेल्या वर्षभरात महापुरापाठोपाठ कोरोनाच्या संकटांचा सामना करावा लागला. त्यावर मात करीत विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला. ड्रेनेज योजना, अमृत पाणी योजना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. यंदा प्रथमच कोरोनामुळे सर्व सदस्यांच्या समक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची परंपरा खंडित होत आहे. अंदाजपत्रक मंजुरीचे सर्व अधिकार महापौरांना देण्यात आले. 

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे 
1) मिरज विभागीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी 25 लाख, सांगली व मिरजेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी अनुक्रमे 15 लाख व 20 लाखांची तरतूद. 
2) कुपवाड शहरासाठी नव्याने ड्रेनेज योजनेचा आराखडा करण्यात आला. 250 कोटींचा आराखडा तयार आहे. कुपवाड शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना राबविण्यासाठी एक कोटीचा निधी देण्यात आला. 
3) महापालिका क्षेत्रातील युवक व विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफाय सेंटर उभारण्यासाठी एक कोटीची तरतूद. 
4) महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 50 लाखांची तरतूद. 
5) तीन नवीन शववाहिका खरेदीसाठी 45 लाख, तर लिंगायत समाजासाठी स्वतंत्र 15 लाखांची शववाहिका खरेदीसाठी तरतूद. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven hundred crore budget presented to the General Assembly