esakal | विसापूरला पाण्याची भीषण टंचाई; उन्हाळा कसा काढायचा ? 

बोलून बातमी शोधा

Severe water scarcity in Visapur; How to draw summer?}

विसापूर : येथे पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. दोन दिवसाने एकदा पाणी मिळू लागल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी प्रचंड धावाधाव सुरू आहे.

विसापूरला पाण्याची भीषण टंचाई; उन्हाळा कसा काढायचा ? 
sakal_logo
By
अनिता माने

विसापूर : येथे पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. दोन दिवसाने एकदा पाणी मिळू लागल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी प्रचंड धावाधाव सुरू आहे. विहिरीचे पाणी हिवाळ्यातच आटले त्यामुळे उन्हाळा कसा काढायचा असा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. ग्रामपंचायतींने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

विसापूर प्रादेशिक नळ योजना बंद होऊन जमाना झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना स्थानिक नळ योजनेवरच तहान भागवावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी येथील ओढ्यात दोन मोठ्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत. मात्र ओढ्याला पाणी असेपर्यंतच या विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. एरवी उन्हाळ्यात आरफळ किंवा ताकारी ला पाणी आले तरच विहीरींना पाणी येते. 

सध्या आरफळचे आवर्तन सुरू आहे. कॅनॉलमधुन थेट बंधाऱ्यात पाणी येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी पोट कॅनॉलमध्ये दगडा सह माती घातल्यामुळे ओढ्यात येणारे पाणी बंद झाले आहे. आरफळ योजनेला पंधरा दिवस पाणी आले आहे. मात्र पोट कॅनॉल बंद असल्यामुळे ओढ्यात पाणी येत नाही. पर्यायाने वसंत बंधारा रिकामा झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी शेतीसाठी वसंत बंधाऱ्यातून बेसुमार पाणी उपसा केला आहे. त्यामुळे बंधारा कोरडा पडला आहे. याचा फटका योजनेच्या विहीरींना बसला आहे. त्यामुळे विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. पर्यायाने गावकऱ्यांना दोन दोन दिवस आडाने पाणी मिळू लागले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या आठ दिवसात टॅंकर सुरू करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

याबाबत सरपंच दिलीप माने, उपसरपंच राजेंद्र भाट तसेच ग्राम विकास अधिकारी मच्छिंद्र झांबरे यांनी सांगितले की, पोट कॅनल मधील दगड माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यासाठी आरफळ योजनेच्या अधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आज दिवसभरात हे काम पूर्ण होईल. तसेच थेट बंधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी पाईपलाईन ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे दोन दिवसात योजनेचे नियमित पाणी मिळेल. 
 


संपादन : प्रफुल्ल सुतार