Maharashtra : ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यापासून सावधान!

काही वर्षांत ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे लैंगिक भाव-भावनांचा आधार घेत ब्लॅकमेलिंग करीत फसवणुकीचा फंडा चर्चेत आहे
Sextortion
Sextortionsakal

सांगली : फसवणुकीचे नाना फंडे समाजमाध्यमांच्या माध्यमातून पुढे येत असतात. त्यात, गेल्या काही वर्षांत ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे लैंगिक भाव-भावनांचा आधार घेत ब्लॅकमेलिंग करीत फसवणुकीचा फंडा चर्चेत आहे. अशा स्वरुपाच्या फसवणुकीबाबत आधी तक्रारीच केल्या जात नाहीत. केल्या तरी त्याची वाच्यता होत नाही. इथे केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही फसतात. आर्थिक फसवणुकीबरोबरच अगदी आत्महत्येपर्यंत ते पोहोचतात. पुण्यात दोन तरुणांच्या आत्महत्येने या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. सायबर सेलकडे अशा नोंदी होतात. प्रकरणे निकालात निघतात. मात्र हा फंडा समजून त्याबाबत सावध झाले पाहिजे.

घटना १ः घटना दोन वर्षांपूर्वीची. एक विधवा शिक्षिका. चांगल्या पगारदार. त्यांची एका अमेरिकेतील अनिवासी भारतीय तरुणाकडून फेसबुकवर मैत्रीसाठी ‘रिक्वेस्ट’ येते. ऑनलाइन मैत्रीचा विस्तार अमेरिकेतून भेटवस्तू पाठवण्यापर्यंत पोहोचतो. रात्री उशिरापर्यंत चॅटिंग, व्हिडिओ कॉल असं सारं काही सुरू होते. अंतिमतः हा संवाद (?) कामुक संभाषणापर्यंत आणि तिथून एकमेकाला नको त्या अवस्थेतील व्हिडिओ कॉलिंगपर्यंत सुरू होता. साधारण सहा महिन्यांनंतर तो तिला वेगवेगळ्या कौटुंबिक गरजा सांगून पैसे मागू लागला. हळूहळू करीत हा आकडा सहा लाखांवर गेला आणि त्या शिक्षिकेला आपण फसतो आहोत, याची जाणीव झाली. त्यानंतर अधिकच्या पैशांच्या मागणीसाठी ब्लॅकमेलिंगचे सत्र सुरू झाले. असह्य झाल्यावर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

घटना २ः तीसवर्षीय युवकाला फेसबुकवर एक व्हिडिओ कॉल येतो. एक युवती त्याला बाथरूममध्ये जायला सांगते. मग एकमेकांचे नको त्या स्थितीतील व्हिडिओ संभाषण होते. ते झाल्यानंतर त्याच्या एका मित्राला ‘त्या’ अवस्थेतील व्हिडिओ जातो. पाठोपाठ सर्व मित्रांना पाठवण्याची धमकी येते. बदल्यात चाळीस हजार रुपये ऑनलाइन पाठवण्याची मागणी होते. भीतीने तो युवक दहा हजारांची मागणी पूर्ण करतो आणि दुसऱ्या दिवशी तो पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेतो. संबंधित खातेच ‘ब्लॉक’ केले जाते. ते संभाषण दहा हजारांचा खुर्दा करून गेले होते.

या दोन्ही घटना पोलिस मुख्यालयात सायबर सेलकडे तपासाला आलेल्या. मात्र तिथंपर्यंत न आलेल्या आणि फसलेल्यांची गणतीच करता येणार नाही. व्हॉट्सॲपवर अनोळखी नावाने मेसेज येणे, कामुक भाषेतील सांकेतिक मेसेज रात्री उशिरा टाकत संभाषणाला प्रवृत्त करायचे आणि सावज टप्प्यात आले की शिकार करायची. फसवणुकीचे नाना फंडे असले तरी अंतिमतः परिणाम एकच. फसवणूक, पश्‍चात्ताप आणि प्रसंगी आत्महत्या. लैंगिक सहज भावनांची आस असतेच. लैंगिकतेच्या कोंडमाऱ्यातून कुचंबलेल्या मानसिकतेचा गैरफायदा घेत असे प्रकार होतात. सर्व वयोगटांतील फसलेले स्त्री-पुरुष प्रतिष्ठेपोटी वाच्यता टाळतात. प्रकार वाढत जातात. हे सारे ‘सेक्सटॉर्शन,’ जे कोणाच्याही वाट्याला येऊ शकते. आजच्या ‘व्हर्च्युअल’ जगाचे हे वास्तव आहे. यावर उपाय एकच सावध आणि सावधान राहणे.

अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांक व फेसबुक खात्यावरून येणाऱ्या कोणत्याही आवाहनाला प्रतिसादच देऊ नका. केवळ एवढ्यावरच थांबू नका, तर त्यांना ‘ब्लॉक’ करतानाच त्याबाबतचे ‘रिपोर्टिंग’ही करा. त्यानंतर व्हॉट्सॲप किंवा फेसबुककडून त्या क्रमांक किंवा खात्याची चौकशी होते आणि त्यांना कायमचे ‘ब्लॉक’ केले जाते. त्यामुळे अधिक प्रमाणात रिपोर्टिंग होणे गरजेचे असते. सध्याच्या आभासी जगात टाळता न येणारे हे ‘अपघात’ आहेत. आपण सहीसलामत कसे राहू, याची ज्याची-त्याने दक्षता घेणे इतकेच शक्य आहे.

दिनेश कुडचे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ

आमच्याकडे अशा रोजच तक्रारी येतात. अगदी एमबीबीएस, एमबीए पदवीधर आणि अगदी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरीलही मंडळीही सावज झाल्याची उदाहरणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे फसगतीनंतर लज्जेखातर स्वतःचा कोंडमारा करू नका. सायबर सेलकडे तत्काळ या. कोणताही बभ्रा न करता तुमची भामट्यांच्या तावडीतून आम्ही सुटका करू. अशा तक्रारींबाबत फिर्याद न देताही चौकशी करून निराकरण केले जाते. अशा प्रकारात सावज ठरलेल्या पुण्यातील तरुणांची बिल्डिंगवरून आत्महत्या हे अगदी ताजे उदाहरण आहे. अशी वेळ येऊ देऊ नका.

- रोहिदास पवार, उपनिरीक्षक, सायबर सेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com