
आटपाडी (जि.सांगली)- सामुदायिक निर्णय आणि शेतकऱ्यांचे ऐक्य यातून एकाच वेळी प्रभावी कामे करणे हेच खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागाना संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेट व आच्छादन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावेन. तसेच डाळिंबाचे मार्केटिंग प्रभावी करण्यासाठी काम करण्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खानजोडवाडीतील शेतकऱ्यांना दिली.
आटपाडी (जि.सांगली)- सामुदायिक निर्णय आणि शेतकऱ्यांचे ऐक्य यातून एकाच वेळी प्रभावी कामे करणे हेच खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागाना संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेट व आच्छादन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावेन. तसेच डाळिंबाचे मार्केटिंग प्रभावी करण्यासाठी काम करण्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खानजोडवाडीतील शेतकऱ्यांना दिली.
श्री. पवार हे आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी येथील निर्यातक्षम डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी आणि संवाद साधण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, अरुण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आमदार दीपकआबा साळुंखे, डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, रोहित पाटील आदी होते.
खानजोडवाडी येथील प्रकाश सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी यांच्या डाळिंब बागेची पाहणी केली. तेथेच शेतकऱ्यांनी यशस्वी डाळिंब घेण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती घेतली. यानंतर गावात शेतकऱ्याची संवादवजा सभा पार पडली. पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, प्रभाकर चांदणे आणि शेतकरी शामराव सूर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी श्री. पवार यांनी स्वतः बारामतीत लावलेल्या आणि तेल्या रोगाने डाळिंब बाग गेल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी जास्त पाणी लागणाऱ्या ऊस पिकाच्या मागे न लागता कमी पाण्यावर येणाऱ्या फळबागांकडे आपला कल वाढवावा असे आवाहन केले.
ते म्हणाले, ""1989 मध्ये रोजगार हमी योजनेत डाळिंबाचा समावेश केला. त्यानंतर डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. मी परदेशात फिरताना लंडनच्या बाजारपेठेत मला डाळिंब पाहिला मिळाले. त्यावर मेड इन इंडियाचा शिक्का होता आणि ते डाळिंब आपल्या भागातील होते. खानजोडवाडी प्रमाणेच शेतकऱ्यांनी एकत्र बसून एकाच वेळी हंगाम धरावा. रोज नियमित बैठका घेऊन औषध फवारणी आणि इतर कामे निश्चित करून ती एकाच वेळी संपूर्ण गावाने करावीत. त्यामुळे रोगराई कमी राहते. राज्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्शच या गावाने घालून दिला आहे.''
ते म्हणाले, "" राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्याला निधी येतो. तो निधी शेतीच्या कोणत्या योजनासाठी खर्च करावा याचा निर्णय त्या त्या राज्यातील शासनाने त्यांची परिस्थिती पाहून घेण्याचे धोरण ठरवावे. याच योजनेतून राज्य सरकारला शेडनेट व आच्छादन अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मी भेट घेऊन मागणी करणार आहे. याशिवाय डाळींबाचे मार्केटिंग अधिक प्रभावी करण्यासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.''
श्री. पवार यांनी आटपाडी भागातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गलाई व्यवसाय, डाळिंब, आटपाडीची सर्कस, चाळीस वर्षापूर्वी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत पिंजून काढलेला आटपाडी तालुका यावर प्रकाश टाकला. शिवसेनेचे तानाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, डाळिंब उत्पादक फळबाग संघाचे आनंदराव पाटील, भारत पाटील, ऍड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर आदी उपस्थित होते. सरपंच रामदास सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.