शक्तिपीठ महामार्गाला विविध पातळ्यांवर विरोध सुरू आहे. त्यात प्रामुख्याने शेतजमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याचा वाद मुख्य आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे रेडिरेकनरच्या चारपट मोबदला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सांगली : शेतकऱ्यांच्या (Farmers) विरोधामुळे वादात अडकलेल्या पवनार ते पत्रादेवी अर्थात नागपूर ते गोवा महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी (Nagpur to Goa Shaktipeeth Highway) राज्यातील अकरा जिल्ह्यांत क्षेत्र मोजणीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १८ गावांचा समावेश आहे. रस्ते विकास महामंडळाने (Road Development Corporation) आज ऑनलाईन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या. जिल्ह्यात जमिनीच्या १३४० गटांमधून हा महामार्ग जाणार असून, सुमारे ५९६ हेक्टर क्षेत्र अधिगृहित केले जाणार आहे.