Loksabha 2019 : विस्‍तवाशी खेळाल, तर उलथवून टाकू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.

कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या मोदी सरकारकडून लोकांचा भ्रमनिरास झाला असून, असले फसवे सरकार उलथवून टाका, असे आवाहनही पवार यांनी केले.

माजी खासदारांमुळे ११२ कोटी रुपये गेले
आम्ही कर्जमाफी केली, त्या वेळी कोल्हापूरला किती पैसे मिळाले, अशी विचारणा श्री. पवार यांनी केली. श्री. मुश्रीफ यांनी २८९ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितल्यानंतर जिल्ह्याला २५० कोटी रुपये मिळाले, पण एका लोकप्रतिनिधींनी तक्रार केली आणि यातील ११२ कोटी परत गेले, असा टोला श्री. पवार यांनी माजी खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक यांचे नाव न घेता लगावला.

दरम्यान, सत्ता उलथवून टाकण्यासाठी एक-एक खासदार महत्त्वाचा असून, खासदार धनंजय महाडिक व खासदार राजू शेट्टी यांना विजयी करा, असेही ते म्हणाले. 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ कागल येथील गैबी चौकात झालेल्या विराट सभेत श्री. पवार बोलत होते. आपल्या ३६ मिनिटांच्या भाषणात श्री. पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करतानाच जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार महाडिक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

श्री. पवार म्हणाले, की १२ दिवसांत मी १४ जिल्ह्यांचा दौरा केला. दुष्काळ, पिण्याचा प्रश्‍न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न दिसला, पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा चेहरा सुकलेला दिसला, त्यांच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा ही चिंता दिसली. कर्जबाजारीपणामुळे आपल्या अब्रूचा पंचनामा होईल म्हणून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलेले पाहिले. गेल्या दोन वर्षांत राज्यात १९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण, या सरकारला त्याची चिंता नाही. शेतमालाच्या किमती वाढल्या तर हा प्रश्‍न सुटेल; पण हे सरकार धनाढ्य लोकांना दिलेली कर्जे माफ करण्यासाठी पैसे देते. मात्र, या शेतकऱ्यांना पैसे देत नाही.

ते म्हणाले, की आमच्या काळातही आत्महत्या झाल्या, पण मी तातडीने त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भेटलो. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. यवतमाळला आम्ही दोघांनी भेट देऊन पाहणी केली. ‘नाबार्ड’, रिझर्व्ह बॅंकेकडून माहिती घेतली आणि देशातील शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतीमाल, उसाच्या किमती वाढल्या पाहिजेत, आम्ही या किमती वाढवल्या. आज सत्तेत असलेले लोक मात्र या किमती वाढविण्यास विरोध करीत आहेत. शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही काम केले. पण, मोदी सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत.

आम्ही बळीराजा जगला पाहिजे हे सूत्र पाहिले, आजचे सरकार त्याकडे पाहत नाही, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की जशी शेती संकटात त्याचप्रमाणे अन्य उद्योगही संकटात आहेत. नाशिकमध्ये मला कामगार भेटले आणि त्यांनी नोकऱ्या गेल्याचे सांगितले, कारखानदार भेटले आणि त्यांनी कर्जबाजारी झाल्याचे सांगितले. कसलीही मदत केंद्र सरकारने उद्योगाला केली नाही. दुसरीकडे मूठभर उद्योजकांच्या हिताची जपणूक सरकार करीत आहे. गरीब माणसाच्या हितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केले, आता त्यावरच हल्ला करण्याचा डाव सरकारचा आहे. वाटेल ती गोष्ट आम्ही सहन करू; पण संविधानाला हात लावून विस्तवाशी खेळू नका, अन्यथा ही जनता सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही.

ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालय असो किंवा रिझर्व्ह बॅंकेसारख्या घटनात्मक संस्थांत आतापर्यंत एवढा कधी हस्तक्षेप झाला नाही. रिझर्व्ह बॅंकेवर दबाव आणून बॅंकेतील पैसा विशिष्ट योजनांसाठी सरकारने घेतला. त्यातून मोदींनी ज्यांना गर्व्हनर केले ते ऊर्जित पटेल राजीनामा देऊन परदेशात निघून गेले. रिझर्व्ह बॅंक, न्यायालयातील हस्तक्षेपातून सरकार वेगळ्या पद्धतीने देशात हुकूमशाही आणण्याचा डाव आखत आहे, तो उखडून लावल्याशिवाय आता जनता स्वस्थ बसणार नाही. या देशाचे रक्षण करण्याची ताकद आमच्याकडे होती, आताच्या सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही. या सरकारच्या कार्यकाळातच अक्षरधाम, रघुनाथ मंदिर, कारगिल, संसदेवर, अमरनाथ यात्रा, ऊरी, पठाणकोट असे कितीतरी हल्ले झाले. हे सरकार फक्त गप्पा मारण्यात गुंग आहे. दहशतवादाला तोंड त्यांनी का दिले नाही. असले नेभळट सरकार देशात कधी आले नव्हते.

यांच्या डोक्‍यात सत्ता गेली
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात, अमर वाघ हा प्रवक्ता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना ‘लावारिस’ म्हणतो. शेतकऱ्यांच्या पोरांकडे माणसुकीच्या दृष्टीने पाहण्याऐवजी त्यांची अवहेलना केली जाते, यावरून या लोकांच्या डोक्‍यात सत्तेची हवा गेल्याचे श्री. पवार म्हणाले. 

गंगाच अपवित्र झाली असती
उमा भारती या केंद्रीय पाटबंधारेमंत्री होत्या, त्यांनी २०१८ पर्यंत गंगा नदी स्वच्छ झाली नाही तर जलसमाधी घेण्याची घोषणा केली. पण, गंगा काय स्वच्छ झाली नाही. मात्र, त्यांनी जलसमाधी घेतली नाही ते बरे झाले. नाही तर नदी आणखी प्रदूषित झाली असती, असा टोला श्री. पवार यांनी लगावला. 

आता कुठल्या चौकात फाशी द्यायची?
नोटबंदी केल्यानंतर ६० दिवसांत परदेशातील काळा पैसा आणू, शंभर दिवसांत तो गरिबांना देऊ, नाही दिला तर कोणत्याही चौकात फाशी द्या, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आम्ही त्या भानगडीत पडलो नाही; पण आता त्यांनीच फाशीसाठी कोणता चौक तो सांगावा, असा टोलाही श्री. पवार यांनी हाणला. 

नव्या खासदारांना महाडिकांकडून धडे
गेल्या निवडणुकीत तुम्ही अतिशय जागरूकपणे खासदार महाडिक यांना संधी दिली. त्यांनीही पाच वर्षांत पहिल्या पाच खासदारांत येण्याचा मान मिळविला. विकासासाठी निधी कसा आणायचा हे त्यांच्याकडून शिकावे, म्हणून निवडणुकीनंतर नव्या खासदारांना आम्ही श्री. महाडिक यांच्याकडून धडे देणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 

तुम्ही प्रतारणा करणार नाही
श्री. महाडिक यांनी विमानतळ, रेल्वेसाठी चांगले काम केले. म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी द्या, तुम्ही नेत्यांनी (मुश्रीफ) दिलेला शब्द शाश्‍वत मानून त्याच्याशी प्रतारणा करणार नाही, कुणी काहीही सांगितले तरी तुम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही, अशी मला खात्री आहे, असा विश्‍वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला. 

वाघाच्या बच्च्यांनो,
श्री. पवार यांनी भाषणात श्री. मुश्रीफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांच्या नेतृत्त्वाखालील साखर कारखाना, जिल्हा बॅंक देशात आघाडीवर असल्याचे श्री. पवार म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी ‘ढाण्या वाघाचा’ असा मुश्रीफ यांचा जल्लोष सुरू केला. बराच वेळ हा जल्लोष सुरू राहिल्यानंतर ‘वाघाच्या बच्च्यांनो’ असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

आमदार असावा तर मुश्रीफांसारखा
आमदार हसन मुश्रीफ यांच्यासारखा लोकप्रतिनिधी संपूर्ण देशात पाहायला मिळणार नाही. मुंबईच्या चांगल्या रुग्णालयात मतदारसंघातील लोकांवर उपचार करण्याचे काम फक्त त्यांनीच करावे. इथल्या लोकांना मुंबईतील रुग्णालयाचा खर्च कसा परवडतो, हा मला प्रश्‍न होता. पण, श्री. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाच्या काळात ते काम केले होते, म्हणूनच मुश्रीफांसारखा आमदार मी पाहिला नाही, असे गौरवोद्‌गार श्री. पवार यांनी काढले. 

मुश्रीफ झाले भावनाविवश
या वेळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत श्री. महाडिक यांना एकही मत कमी पडणार नाही. त्यांच्या विजयासाठी माझे कार्यकर्ते हाडाची काडे आणि रक्‍ताचे पाणी करतील, गेल्या वेळी आम्ही श्री. महाडिक यांना मताधिक्‍य देऊ शकलो नाही, पण रणधुमाळीत अग्रेसर होतो, त्याचप्रमाणे यावेळीही त्यांना विजयी करू, आपण निश्‍चिंत राहावे. कारण आज हा मुश्रीफ आहे तो फक्त तुमच्यामुळेच, असे भावनिक उद्‌गार श्री. मुश्रीफ यांनी काढले. या वेळी ते प्रचंड भावनाविवश झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. यामुळे सभेचे वातावरणही काही काळ धीरगंभीर झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar comment in Kagal Kolhapur