शरद पवार कार्यकर्त्यांना देणार ऊर्जा ?  रविवारच्या दौऱ्याकडे लक्ष

उमेश बांबरे
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून देणार आहेत.

सातारा ः बदलत्या राजकीय समीकरणामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला सावरून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी खासदार शरद पवार सध्या जिल्हानिहाय दौरा करत आहेत. येत्या रविवारी (ता.22) ते साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये सर्वांची भूमिका जाणून घेणार आहेत. यानिमित्ताने ते कार्यकर्त्यांना चार्ज करून त्यांच्यात ऊर्जा भरणार आहेत. या दौऱ्यात सातारा लोकसभेसह विधानसभेचे सातारा, फलटण आणि माण-खटावचे उमेदवार निश्‍चित करण्याची शक्‍यता आहे. 

शिवस्वराज्य यात्रेने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतील निराशा दूर केली. पण, भाजपने राबविलेल्या मेगाभरतीत माजी खासदार उदयनराजेंसह शिवेंद्रसिंहराजे भोसलेही भाजपमध्ये गेले. त्यामुळे सातारा विधानसभा व लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला फटका बसला. शिवेंद्रसिंहराजेंपाठोपाठ उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने या दोघांची राष्ट्रवादीतील ताकद आता भाजपला मिळाली आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या ताकदीला सुरूंग लागल्याने कार्यकर्ते सैरभैर होण्याची भीती निर्माण झाली आहे. या कार्यकर्त्यांना थोपविण्यासोबतच पक्षाला पुन्हा भरारी देण्यासाठी शरद पवार यांचा सातारा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

श्री.पवार यांची साताऱ्यातील गणिते चुकली असली तरी कार्यकर्त्यांची गणिते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत चुकू नयेत, यासाठी शरद पवार त्यांची समजूत काढून पुन्हा सावरण्यावर भर देणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करून सातारा जिल्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून देणार आहेत.

त्यासाठी आनेवाडी टोलनाक्‍यापासून शरद पवार यांना घेऊन रॅलीने पोवई नाक्‍यावर आणले जाणार आहे. येथे ते रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा होणार आहे. या मेळाव्यात श्री. पवार कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन आगामी निवडणुकीसाठीची रणनीती आखणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राष्ट्रवादीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यानंतर श्री. पवार सातारा विधानसभा, सातारा लोकसभा आणि माण-खटावमधील राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी ते चाचपणीही करणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवार या मेळाव्यातून ऊर्जा देऊन निवडणुकीसाठी सज्ज करणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar to give energy to activists? Look for a Sunday tour