कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनाच नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कर्मवीर समाधी परिसरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते नारायण मूर्ती, अनू आगा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ऍड. भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे आदी.

सातारा ः हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करत इन्फोसिसच्या माध्यमातून नारायण मूर्ती यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. तर अनू आगा यांनी थरमॅक्‍सच्या माध्यमातून उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनाच दिलेला नाही. मुलींनी अनु आगांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दीनिमित्त आज (शुक्रवार) कर्मवीर समाधी परिसरात झालेल्या कार्यक्रमात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार आणि "थरमॅक्‍स'च्या अनू आगा यांना सौ. लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार श्री. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ऍड. भगीरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, विलासराव महाडिक आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ""कर्मवीरांनी लावलेला हा "रयत'चा वृटवृक्ष विशाल झाला आहे. काळाप्रमाणे बदलत संस्थेने शंभर पिढ्या घडविल्या. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाने संपृक्त पिढी तयार व्हावी, हीच संस्थेची अपेक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येचा बोजा शेतीवर येत आहे. कुटुंबात शेतीचे विभाजन होत राहिले आहे. फक्त शेती करून चालणार नाही. कुटुंबातील एकाने शेती करावी आणि एकाने अन्य क्षेत्रात जाऊन यश मिळवत इतरांना उद्योग, रोजगार उपलब्ध होईल असा प्रयत्न करावा, ही राष्ट्रीय गरज आहे.''

यावेळी त्यांनी श्रीमती आगा यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, "" साखर कारखान्यात मळीपासून अल्कोहोल निर्मिती आणि चिपाडापासून वीजनिर्मिती केली जाते. त्याला लागणारी मशिनरी तयार करून थरमॅक्‍सच्या माध्यमातून श्रीमती आगा यांनी फार मोठे कार्य केले आहे. देशाच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्या उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्यांना आपण आज पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. संस्थेतील मुलींनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी.''

नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसचा जगातील 45 देशांत विस्तार करून देशाच्या आणि तरुणांच्या प्रगतीला पंख दिले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा स्वीकार जगाने केला आहे. त्यातून खूप संपत्ती जमा झाली, पण ती सर्व संपत्ती त्यांनी समाजाला अर्पण केली. त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान आज संस्था करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.''

यावेळी अनू आगा यांनी संस्थेच्या यशस्वी शतकी वाटचालीबद्दल अभिनंदन केले. तसेच कृतज्ञताही व्यक्त करीत देशापुढील समस्यांचा उहोपोह केला. आजही अनेक नागरिकांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कुपोषणाची देशात समस्या आहे. तसेच युवकांना कौशल्य विकासाचे शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

नारायण मूर्ती यांनी शिक्षणाबद्दलची रयत शिक्षण संस्थेची बांधिलकी अत्यंत मोलाची असल्याचे सांगून उद्योग, माहिती तंत्रज्ञानातील बदल आणि गरजांची माहिती दिली. 
कार्याध्यक्ष डॉ. पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, सौ. लक्ष्माबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागाची माहिती दिली. सचिव प्राचार्य डॉ. कराळे यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. सहसचिव प्राचार्य डॉ. सावंत यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar presented the rayat mauli award to Narayan Murti and Anu Aga at satara