...तर निवडणुका हाच पर्याय - शरद पवार

निवास चौगुले
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोल्हापूर - राज्यातील शिवसेना व भारतीय जनता पार्टीची युती तुटली असली तरी तुर्तास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यापैकी कोणालाही पाठिंबा नसेल. हा निर्णय एकत्र बसून घेण्याचा असल्याची गुगली टाकत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर निवडणुका हाच पर्याय असू शकतो, असे सांगत पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले. 

कोल्हापूर - राज्यातील शिवसेना व भारतीय जनता पार्टीची युती तुटली असली तरी तुर्तास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा यापैकी कोणालाही पाठिंबा नसेल. हा निर्णय एकत्र बसून घेण्याचा असल्याची गुगली टाकत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर निवडणुका हाच पर्याय असू शकतो, असे सांगत पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले. 

दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेले पवार यांनी आज (शनिवार) सकाळी हॉटेल पंचशील येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,"सेना-भाजपाची युती तुटली ही चांगली गोष्ट झाली, त्यात आम्ही काय करणार. त्याचा फायदा दोन्ही कॉंग्रेसलाच होईल. पण सरकारमधील शिवसेना असो किंवा भाजपाला राष्ट्रवादीचा कधीही पाठिंबा नसेल. यापुर्वी पाठिंबा दिला नव्हता, आताही नाही.' 

ते म्हणाले,"शिवसेनेने यापुढे कोणत्याच निवडणुकीत भाजपाशी युती करणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये राहील असे मला वाटत नाही. शिवसेना सरकारमधून जर बाहेर पडली नाही तर सत्तेसाठी हे लोक काहीही करतात असा संदेश लोकापर्यंत जाईल.' 

युती तुटण्याचे भाकित यापुर्वीच तुम्ही केले होते या प्रश्‍नावर बोलताना श्री. पवार म्हणाले,"माझे तसे निरीक्षण होते, हे लोक मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर एकत्र रहाणार नाहीत याचे संकेत पुर्वीच मिळत होते. वृत्तपत्र व दूरचित्रवाणीमधून मात्र वारंवार युती टिकेल असे चित्र रंगवले जात होते, पण माझे निरीक्षण वेगळे होते.' 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले,"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थितीही वेगळी असते. देश किंवा राज्याचे धोरण, राजकारण ठरवणाऱ्या या निवडणुका नसतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणाशी आघाडी कोणी केली याला काही अर्थ रहात नाही.' 

यावेळी महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडीक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, आर. के. पोवार आदि उपस्थित होते. 

निरूपम हा मुर्ख माणूस 
राष्ट्रवादी-भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप करणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा चांगलाच समाचार श्री. पवार यांनी घेतला. या आरोपाबाबत निरूपम हा मुर्ख माणूस आहे. राज्याच्या प्रगतीत या माणसाचे योगदान काय ? ज्या पदावर ते आहेत तेथून पायउतार झाल्यानंतर त्यांची किंमत काय रहाणार ? त्यांना कोण विचारणार ? त्यांनी कोल्हापुरसाठी तरी काय केले आहे का ?, या शब्दात श्री. पवार यांनी त्यांचा समाचार घेतला. निरूपम यांच्या विषयावर पवार चांगलेच भडकले. 

राष्ट्रपती पदाबाबत भान आहे 
आपण राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार का ? या प्रश्‍नावर बोलताना श्री. पवार म्हणाले,"माझ्या पक्षाचे संख्याबळ पाहता मला परिस्थितीचे भान आहे. पुरेस संख्याबळ नसताना या पदाचा विचारही डोक्‍यात नाही. मी त्याबाबत आशावादी नाही.'

Web Title: Sharad Pawar talked about NCP, BJP alliance