सांगलीत शत्‌प्रतिशत भाजपसाठी मुख्यमंत्र्यांची मशागत

सांगलीत शत्‌प्रतिशत भाजपसाठी मुख्यमंत्र्यांची मशागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा दिला. महापूर हा मुद्दा निवडणुकीत गाजणार हे लक्षात घेऊन दुष्काळी भागाकडे पुराचे पाणी वळविण्याची घोषणाही करून टाकली.

उदयनराजेंचा भाजपमध्ये नाट्यमय प्रवेश घडवत मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या रंगमंचावर इस्लामपूरच्या विंगेतून प्रवेश केला. अर्थातच जयंतरावांच्या  सभेला चार माणसेही नसतात, म्हणून त्यांना अमोल कोल्हेंसोबत सभा घ्याव्या लागतात, अशी टीका करत निशाणा साधला. अर्थात सध्या कडकनाथ प्रकरण येथे गाजत असल्याने कोंबड्यांनी या दौऱ्यात ‘फुटेज’ खाल्ले.  कारण, सदाभाऊंचे नाव विरोधकांनी या प्रकरणात गोवल्याने त्यांची सुरक्षाही आणखी तगडी करताना पोलिस प्रशासनाच्या नाकी नऊ आणले. एवढ्या तगड्या बंदोबस्तातही या कोंबड्या दौऱ्यात पळू लागल्याने गृहखात्याला आणि कार्यकर्त्यांना लंगडी घालायला लावलीच ! 

जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री सांगलीकडे यायला निघतात तेव्हा त्यांच्यासमोर काही ना काही संकटे येतात. आजवर अनेकदा त्यांचे सांगलीचे दौरे त्यांना रद्द करावे लागले होते. महापुरातच्या काळातसुद्धा त्यांना कोल्हापुरातूनच  मुंबईला परत जावे लागले. आम्ही याच सदरात सांगलीकरांची नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर मग सांगलीकर नाराज होऊ नयेत म्हणून सांगलीसाठी दोन दिवसांत दुसरा हवाई दौरा करावा लागला होता. जनादेश यात्राही सांगलीची मूळ नियोजनानुसार पुढे ढकलावी लागली होती. सांगली भाजपसाठी फलदायीदेखील ठरली आहे, याची जाण त्यांना ठेवावी लागली.

पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपला पहिल्यांदा स्पेस दुष्काळी जतने दिली आणि बघता बघता जयंतरावांच्या डोळ्यादेखत भाजपने येथे ‘जेजेपी’ची खऱ्या अर्थाने ‘बीजेपी’ कधी केली हे अनेकांना कळले देखील नाही. सलग दुसऱ्यांदा लोकसभेची जागा भाजपने येथे निवडून आणल्याने विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिराळ्याचे देशमुख घराणेही आले. काँग्रेसची मोठी ॲसेट असलेल्या शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित यांनाही काँग्रेसवर भरोसा राहिला नाही.

सत्यजित तर जयंतरावांचे साडू आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने भाजपने काँग्रेसपेक्षाही जयंतरावांनाही धक्‍का दिला आहे. कारण सांगलीकरांना नाग आणि वाघातील वैर माहीत आहे. आता सत्यजितना नागालाच साथ द्यावी लागणार आहे. त्यांच्यामुळे येथे भाजपची ताकद वाढली असून जयंतरावांसाठी ही जागा प्रतिष्ठेची असल्याने चिंता वाढली आहे. जयंतरावांपुढे तर अनेक प्रश्‍न असून साताऱ्यातून सारा राष्ट्रवादीच खालसा झाला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कोणालाही फेस न करावी लागलेली अभूतपूर्व पक्ष गळती त्यांना सहन करावी लागत आहे. त्यातच स्वत:च्या मतदारसंघातही भाजपने सारी विरोधकांची फौज सीमेवर आणून ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांची चतुराई म्हणजे सुरवातीपासून पुरोमागी चळवळीत असलेले नागनाथअण्णा यांच्या  घराण्यातील वैभव नायकवडी व गौरव नायकवडी या दोन नेत्यांनी भाजपमध्ये येण्याचे संकेतच दिल्याने सांगली आता संपूर्णपणे भाजपमय होण्याच्या दिशाने चालल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. 

अर्थात, राजकारणाशिवाय विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी आता मोदी-शहा यांच्या धोरणावर सतत टीका करत बसण्यापेक्षा येथे भाजप का वाढतेय, यामागची कारणेही विचारात घेतली पाहिजेत. सांगलीसारख्या शहराचा कोणता विकास काँग्रेसच्या  सरकारने आणि स्थानिक नेतृत्वाने केला? सलग मंत्रिपदे मिळून विकास न झाल्यानेच इथल्या जनतेला सत्ता बदलावी वाटली.

कारण २००५ मध्ये महापूर आला होता. त्यावेळी देखील पुराचे पाणी दुष्काळी भागाला देऊ म्हणणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि आज १६ वर्षांनंतर तिच घोषणा विद्यमान मुख्यमंत्री करत आहेत! जागतिक बॅंकेची मदत घेऊन टनेलद्वारे कृष्णेचे पाणी पावसाळ्यात उचलून ते दुष्काळी भागाला देण्याची तिच घोषणा सांगलीकरांना ऐकावी लागली आहे. 

देवेंद्र यांनी अशक्‍य असलेले मराठा आरक्षण दिले. आता टनेलद्वारे दुष्काळाला पाणी दिले तर पश्‍चिम महाराष्ट्राचे ते भगीरथ ठरतील!  मुख्यमंत्र्यांनी इंचलकरंजीत रोजगार देण्याची घोषणा केली. खरं तर सांगली, जयसिंगपूर आणि इचलकरंजी असा हा एक शहराचाच टापू आहे.

या क्षेत्रात भव्य एमआडीसी होणे आणि नवे उद्योग आणणे ही काळाची गरज आहे. तुमचे राजकारण निवडणुकीपुरते करा, पण रोजगारसाठी काय करता येईल तेवढे करा, यासाठीच आपल्याला जनादेश होता. याबाबतीत युतीचे सरकार गेल्या पाच वर्षांत किती उत्तीर्ण झाले यावर जनता आता फैसला करेल!

बंडाच्या शिडातील हवाच काढून घेतली
मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात भाजपची दिशाही स्पष्ट करण्यात यश मिळवले. त्यांनी शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासमोरील आव्हानांचा भार हलका केला, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्यातील वादाला पूर्णविराम देत घोरपडे यांच्या उमेदवारीचे संकेत देऊन टाकले. सांगलीत काही मंडळी डोके वर काढत असल्याचे लक्षात आल्याने येथेही आमदार सुधीर गाडगीळ यांना जनादेश  द्या, असे आवाहन केले. त्यामुळे बंडाच्या शिडातील हवा त्यांनी काढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com