
कोल्हापूर - गगनाला भिडणाऱ्या मटण दरामुळे हैराण झालेल्या खवय्यांनी फक्त खाटीक अशीच झगडा न करता पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाशी झगडा करणे आवश्यक आहे कारण जसजसा पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय मोडीत निघत आहे तस तसा मटणाचा दर अवास्तव आणि अनियंत्रितपणे वाढत आहे.
आधुनिक शेळी-मेंढीपालन व्यवसायामध्ये उत्पादन खर्च प्रचंड असल्याने पारंपारिक मेंढपाळांच्या सोबत असे व्यवसायिक दराची स्पर्धा करू शकत नाहीत पण अनंत अडचणींच्या दृष्टचक्र सापडलेला पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय आता अंतिम घटका मोजत आहे की काय? अशी अवस्था आहे. या व्यवसायात नवीन पिढी येतच नाही.
शासकीय पातळीवर पारंपारिक मेंढपाळांच्या समस्यांच्या बाबतीत कमालीची उदासीनता असून आपल्या व्यवसायातील आव्हानांच्या बाबतीत संघटितपणे लढा उभारण्यासाठी मेंढपाळाला वेळच नाही कारण ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता मेंढपाळाला 24 तास बकऱ्या सोबत राहावे लागते. चाऱ्याच्या कमतरतेमुळे मेंढपाळाला रोजची वीस-पंचवीस किलोमीटरची भटकंती नित्याचीच असते. पिलांच्या चाऱ्यासाठी ही दूरवरून चारा मेंढपाळांना आणावा लागतो. दिवसभर पायपीट आणि मेहनत करूनही रात्री चोरांचा उपद्रव वाढल्यामुळे रात्रभर जागरण करून पहारा ठेवावा लागतो.अशावेळी मेंढपाळ व्यवसायातील अडचणी संदर्भात सरकार दरबारी वाचा फोडण्यासाठी आंदोलन करायला मेंढपाळ वेळ कोठून आणणार? यामुळे या व्यवसायातील अडचणीत भर पडत जाऊन हा व्यवसायच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परिणाम स्वरूपी रात्रंदिवस काबाडकष्ट करून जनतेला स्वस्त मटण पुरवठा करण्यासाठी झटणारा मेंढपाळ अडचणीत आल्यामुळे भविष्यात हा व्यवसाय संघटित बंदिस्त शेळी मेंढी पालन उद्योजकांच्या हातात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी मटणाचे दर लवकरच हजार-पंधराशे च्या वर जाऊ शकतो.
भारतच नव्हे तर जगभरातील सर्वच प्रगत अप्रगत राष्ट्रांमध्ये मेंढपाळ व्यवसाय पारंपारिक पद्धतीने म्हणजे मुक्त भटकंती पद्धतीने केला जातो .यासाठी मेंढपाळांना पुरेशा प्रमाणात कुरणे उपलब्ध करून दिली जातात व मेंढपाळ व्यवसायासाठी अनेक सोयीसुविधा पुरविल्या जातात त्यामुळे त्यामुळे मेंढपाळ व्यवसाय किफायती होऊन स्वस्त दरामध्ये मटन उपलब्ध होऊ शकते परंतु आपल्या इकडे मुक्त भटकंती ऐवजी बंदिस्त शेळी मेंढी पालनासाठी प्रोत्साहन दिले जात असून यासाठी जमिनीची जागेची व इतर जाचक अटी घातल्या मुळे सर्वसामान्य कष्टकरी मेंढपाळ हा व्यवसाय करू शकत नाही.अलीकडच्या काळात भांडवलदार लोक या व्यवसायात चंचुप्रवेश करीत असून त्यांच्यासमोर स्वस्त बकरी पुरवठा करणाऱ्या पारंपारिक मेंढपाळांची स्पर्धा मोठी आहे .त्यामुळेच तर हा पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय मोडीत काढण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत नाहीत ना ? असा प्रश्न पडतो. याबाबतीत पूर्णतः सकारात्मकपणे सर्वंकष राज्यव्यापी धोरण आखणे व पारंपारिक शेळी-मेंढीपालन व्यवसायाला चालना देणे हाच एकमेव अवास्तव मटण दरवाढी वरील शाश्वत उपाय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.