esakal | शिराळा नगरपंचायत वार्तापत्र : महाडिक गटाकडून युवा उमेदवारांचा शोध सुरू

बोलून बातमी शोधा

Shirala Nagar Panchayat Newsletter: Mahadik Group starts searching for young candidates

राळा नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीसाठी सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक केदार नलवडे यांनी महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून प्रभाग निहाय उमेदवार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

शिराळा नगरपंचायत वार्तापत्र : महाडिक गटाकडून युवा उमेदवारांचा शोध सुरू
sakal_logo
By
शिवाजीराव चौगुले

शिराळा (जि. सांगली) : शिराळा नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीसाठी सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक केदार नलवडे यांनी महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून प्रभाग निहाय उमेदवार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यापद्धतीने व्यूहरचना आखण्यास सुरवात झाली असून त्यामुळे राष्ट्रवादी, भाजप, महाडिक युवा शक्ती अशा तिरंगी लढतीचे वातावरण तयार होऊ लागले आहेत. 


शिराळा नगरपंचायत ही तालुक्‍याचे मिनी मंत्रालय मानले जाते. नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेत्यांनी राजकीय डावपेच टाकण्यासाठी सुरवात केली आहे. मागील निवडणूक ही राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी प्रथमच महाडिक युवा शक्तीने माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सोबत आघाडी केली होती. यात भाजपला सहा जागा मिळाल्या, मात्र महाडिक युवा शक्तीचा उमेदवारास पराभव स्वीकारावा लागला. त्याची भरपाई म्हणून भाजपच्या कोट्यातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक व रणधीर नाईक यांनी महाडिक युवा शक्तीच्या केदार नलवडे यांना स्वीकृत नगरसेवक होण्याचा बहुमान दिला.

त्या संधीचा फायदा उठवत प्रबळ विरोधी व आक्रमक नगरसेवक म्हणून लोकांच्या विविध अडीअडचणी सोडण्याच्या दृष्टीने काम सुरू केले. कोरोनाच्या काळात लोकांना दूध, भाजीपाला, क्वारंटाईन झालेल्या लोकांना चहा, बिस्किटे असे वाटप केले. यामुळे त्यांच्या जनसंपर्कात वाढ झाली. 
तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीवेळी शिराळा तालुक्‍यातील राजकारणात मोठे बदल झाले. एकमेकांचे विरोधक असणारे शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख, हे एकत्र भाजपच्या छताखाली आले; तर विधानसभेला आम्हाला ही भाजपची उमेदवारी द्या, अशी मागणी सम्राट महाडिक यांनी केली. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याने महाडिक यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना बसला. 


सध्या शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक हे भाजपच्या छताखाली असले; तरी नाईक-देशमुख एकत्रित, तर महाडिक यांचा सवतासुभा दिसून येत आहे. पक्षाच्यावतीने शिराळा तालुक्‍यात आंदोलन झाले; तर नाईक-देशमुख यांचे एक व सम्राट महाडिक यांचे एक अशी दोन आंदोलने होतात. यावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष स्पष्ट जाणवतो. महाडिक यांना विधानसभेला शिराळा तालुक्‍यातील अनेक गावात चांगले मतदान झाल्याने त्यांनाही नगरपंचायतीच्या माध्यमातून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायचे आहे. त्यासाठी नगरपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची त्यांनी तयारी केली असून, उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. 

कोट- 
विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक यांना शिराळा शहरातून चांगले मतदान मिळाले. महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीची सोडवणूक करत असल्याने लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्या जोरावर आम्ही महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र भाजपचे वरिष्ठ नेते व सम्राट महाडिक यांच्या विचार विनिमयातून अंतिम निर्णय होणार असला तरी आम्ही निवडणूक लढविणार हे नक्‍की.

- केदार नलवडे, नगरसेवक 

संपादन : युवराज यादव