शिराळा तालुक्‍यात ऊसाचे फडच बिबट्यांची आश्रयस्थाने

शिवाजीराव चौगुले 
Monday, 5 October 2020

चांदोली जंगलापासून तब्बल साठ किलोमीटर अंतरापर्यंत काही दिवसांत बिबटे दिसू लागलेत. ऊसाचे फडच बिबट्यांची आश्रयस्थाने झालीत.

शिराळा : चांदोली जंगलापासून तब्बल साठ किलोमीटर अंतरापर्यंत काही दिवसांत बिबटे दिसू लागलेत. ऊसाचे फडच बिबट्यांची आश्रयस्थाने झालीत. वर्षभरात दर आठ-पंधरा दिवसाला कोणत्या ना कोणत्या गावांत बिबट्या दिसल्याची बातमी येते. इतका त्यांचा सहज वावर झाला. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच शिवारात वावरावे लागत आहे. 

आत्तापर्यंत शिराळा तालुक्‍यातील मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापूर, कुसाईवाडी, मांगले, मिरुखेवाडी, बेरडेवाडी, निगडी, शिराळा, मोरणा धरण, कांदे, कापरी आदी परिसरात बिबट्यांचे माणसे व पाळीव प्राण्यावर हल्ले झालेत. गेल्यावर्षी गोरक्षनाथ मंदिराजवळील बाह्य वळण रस्त्यावर बिबट्याने मोटारसायकल वर उडी मारून शिराळा येथील अभिजित कुरणे याला पायावर पंजा मारून जखमी केले होते. पाच महिन्यांपूर्वी चरण येथील युवक व एक महिला, दोनच दिवसांपूर्वी मांगले येथे युवकावर हल्ला झाला. जून महिन्यात घागरेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या व दोन दिवसांपूर्वी मांगले येथे बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. 

पश्‍चिम घाटात बिबट्यांची संख्या वाढली आहे. ते जंगलाबाहेर पडत आहेत. बाहेरही वाढते ऊसमळे, त्यामधील ससे व डुक्कर असे मुबलक खाद्य त्यांच्यासाठी आहेच. तो सर्व वातावरणात राहू शकतात. ऊसमळ्यातील वास्तव्यही त्यांना सुरक्षित वाटते आहे.
- एस. एल. झुरे, निवृत्त विभागीय वनाधिकारी

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shirala taluka, sugarcane fields are home to leopards