esakal | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांची 'ही' घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray Visit Kadegaon

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली व सातारा जिल्ह्यात आज ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेवरी ( ता. कडेगाव) येथे आनंदा किसन शिंदे या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त टोमॅटोच्या प्लॉटची पाहणी केली

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांची 'ही' घोषणा

sakal_logo
By
संतोष कणसे

कडेगाव ( सांगली ) - अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभी केली जातील. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये,खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, असा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे शेतकऱ्यांना दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली व सातारा जिल्ह्यात आज ओला दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेवरी ( ता. कडेगाव) येथे आनंदा किसन शिंदे या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त टोमॅटोच्या प्लॉटची पाहणी केली. त्यांना दिलासा दिला. तसेच मदतीचेही आश्वासन दिले.

हा आहे आमचा प्रयत्न - ठाकरे

श्री. ठाकरे म्हणाले, सांगली जिल्ह्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. संकटसमयी शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझी धडपड आहे. शेतकऱ्यांना पिकवार नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव तालुक्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने पिकांचे न भूतो असे नुकसान झाले आहे. विशेषतः डाळींब तसेच द्राक्ष बागांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तेव्हा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.

यावेळी खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मोहिते, सुनील मोहिते, अनिल देसाई, इंद्रजित साळुंखे, महेश कदम आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image