पेन्सिलवर साकारले "शिवराय'; हृषीकेश वावरे याचे मायक्रो आर्ट

शैलेश पेटकर
Friday, 19 February 2021

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पेन्सिलच्या टोकावर साकारण्याची किमया येथील हृषीकेश तानाजी वावरे या तरुणाने केली आहे.

सांगली ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तमाम मराठी जणांचा बुलंद आवाज. महाराजांची प्रतिमा पाहिली की अंगात बळ येतं. तीच प्रतिमा पेन्सिलच्या टोकावर साकारण्याची किमया येथील हृषीकेश तानाजी वावरे या तरुणाने केली आहे. पेन्सिलच्या अवघ्या पाच मिलिमीटर टोकावर ही किमयागारी साकारली जातेय. मायक्रो आर्ट प्रकारातील ही कला थक्क करणारी आहे. 

हृषीकेश वावरे रेल्वेस्थानक परिसरात चौकोनी कुटुंबात राहतो. वडील रिक्षाचालक. त्यांना मुलाचा भारी अभिमान आहे. सातवीत असताना हृषीकेश याने "मख्खी' हा मूळ तेलगू चित्रपट पाहिला. त्यातून त्याला ही कल्पना सूचली.

चित्रपटात दाखवलेल्या मायक्रो आर्टप्रमाणे आपणही काही तरी करायला हवे, हा विचार रूंजी घालू लागला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला मनात असूनही या कलेची माहिती घेता आली. निर्धार पक्का होता. त्याने इंटरनेटवरून माहिती मिळवली. 

आधी त्याने खडूवर कलाकृती साकारण्यास सुरवात केली. साहित्य जमवणे, कटर खरेदी, कलाकृती साकारण्यासाठी पुरेसा वेळ काढणे, या साऱ्यात अडचणी तर आल्याच. मित्राच्या मदतीने कटर मिळाले. पेन्सिलच्या टोकावर कलाकृती साकारायला सुरवात केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीपासूनच त्याने सुरवात केली. महाराजांच्या मुद्रा, पूर्णाकृती कलाकृती त्याने साकारल्या. समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल केले. हृषीकेशची कला चर्चेत येऊ लागली. आता तो पेन्सिलच्या टोकावर नावे कोरतोय. आत्तापर्यंत दोनशेहून अधिक कलाकृती साकारल्या आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj on pencil; Hrishikesh Wavre's micro art