esakal | मेअखेर होणार विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा

बोलून बातमी शोधा

सांगलीत यंदा लाखांवर विद्यार्थी देणार ऑनलाईन परीक्षा
सांगलीत यंदा लाखांवर विद्यार्थी देणार ऑनलाईन परीक्षा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना महामारीने शिवाजी विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा पॅटर्नच बदलून टाकला आहे. इंजिनिअरिंग, वाणिज्य, कला आणि आंतरविद्याशाखांमधील 324 विविध अभ्यासक्रमांमधील 98 हजार 500 विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत आहेत. याशिवाय फार्मसी, वास्तुशास्त्र, विधी, एमबीए अशा विद्यापीठाशी संलग्न 55 महाविद्यालयांतील विद्यार्थी इतिहासात प्रथमच पर्यायी स्वरुपाच्या ऑनलाईन परीक्षेला सामोरे जात आहेत. 22 मार्चपासून परीक्षांना प्रारंभ झाला असून मे अखेर या परीक्षा सुरू राहणार आहेत.

कोरोनाने जीवनाचे असे एकही क्षेत्र उरलेले नाही, की जिथे मूलभूत स्वरुपाच्या बदलांना सामोरे जावे लागले नाही. शिक्षण क्षेत्रावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. ऑनलाईन अध्यापन आणि ऑनलाईन परीक्षा अटळ झाल्या आहेत. ऐन परीक्षांच्या हंगामात कोरोनाचा उद्रेक झाल्याने यंदा अध्यापन आणि परीक्षा दोन्हीही ऑनलाईन होत आहेत. परीक्षा विभागाने पूर्ण तयारी करून सर्व्हरची व्यवस्था केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला "ओटीपी' देऊन सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी किचकट वेळापत्रक राबवण्यात येत आहे. विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली आहे. त्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचे आदेश दिले आहेत. महाविद्यालयांनी या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मिळालेले गुण विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पाठवायचे आहेत. दुसऱ्या वर्षापासूनच्या सर्व परीक्षांची जबाबदारी विद्यापीठाने घेतली.

अशा अनुभवाला परीक्षा विभाग प्रथमच सामोरा जात आहे. पर्यायी स्वरुपाच्या प्रश्‍नपत्रिका तयार करण्यापासून अनेक पातळ्यांवर विद्यापीठाची यंत्रणा कार्यरत होती. सध्या सर्व्हर हॅंग होणे, त्यासाठी पुन्हा लॉगीन होणे, रिफ्रेश करून पुन्हा कनेक्‍ट होणे अशा अनेक अडचणींना विद्यार्थी सामोरे जात आहेत. त्याचवेळी परीक्षार्थींच्या या अडचणी सोडवण्यासाठी परीक्षा विभागाने 20 हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. परीक्षा विभागाची स्वतंत्र वॉररूम कार्यरत आहेच; शिवाय प्रत्येक फॅकल्टीमध्ये प्राध्यापकांची टीम रोज 12 तास हजर राहून अडचणींच्या सोडवणुकीत व्यग्र आहे.

"ऑनलाईन परीक्षांचे आव्हान मोठे आहे. परीक्षार्थींकडून कॉपीचे प्रकार होऊ नयेत यासाठी आवश्‍यक अशी तांत्रिक प्रक्रिया मात्र राबवता आलेली नाही. सध्याच्या आव्हानाचे स्वरूप पाहता परीक्षा पूर्ण करणे यालाच प्राधान्य आहे."

- जी. आर. पळसे, डेप्युटी रजिस्ट्रार, शिवाजी विद्यापीठ, परीक्षा विभाग