Vidhan sabha2019 शिवेंद्रसिंहराजेंचा कट्टर कार्यकर्ता राष्ट्रवादीतून लढण्यास इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

खूद्द भोसलेंनी आमदरकीची निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या गटात ही चर्चेचा विषय ठरली आहे. 

सातारा : सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्थान भक्कम असून राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मानेवर आयात केलेला उमेदवार लादू नका. भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास इच्छक असलेले स्वत:च्या पक्षाशी गद्दारीच करुन येणार आहे. अशा व्यक्तीस उमेदवारी देण्यापेक्षा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तरुण रक्ताला संधी देण्याची घोषणा केली असल्याने मी राष्ट्रवादीतून लढण्यास इच्छूक असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले यांनी दिली.
भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून शिवेंद्रसिंहराजे भोसले बाहेर पडल्यानंतर त्यांची उमेदवारी भाजपने अंतीम केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून सातारा-जावली विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतून कोण याची चर्चा सुरु असून त्याबाबत पक्षपातळीवर हालचाली सुरु आहेत. मात्र, काल, परवापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे पद घेवून त्यांच्याच पक्षाने शिवेंद्रसिंहराजेंना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांना विरोध करत काहीजण राष्ट्रवादीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. तशी चर्चा सुरु झाल्याने सातारा व जावली तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ज्यांनी गतवेळी भाजपमधूनच राष्ट्रवादीच्या विरोधात लढवली आहे त्यांना जर पक्षात घेवून विधानसभेची उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी व शरद पवार यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून असलेल्या आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांवर अन्याय ठरणार आहे.
 
या घडामोडी सुरु असताना सातारा-जावली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे. मात्र, आता ज्यांनी राष्ट्रवादीवर टीका करण्यात आयुष्य घालवले त्यांनाच पक्षात आयात करुन उमेदवारी दिल्यास त्याला आमचा विरोध राहील. त्यामुळे कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेनंतर मी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी चर्चा करणार आहे. मी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जयवंत भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.

दरम्यान भोसले हे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात. जिल्हा परिषद सदस्य होण्यापुर्वी ते शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडीतून पालिकेत सदस्य तसेच उपाध्यक्षपद मिळविले होते. खूद्द भोसलेंनी आमदरकीची निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या गटात ही चर्चेचा विषय ठरली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivinderasingh activitst wants to fight against him