शिवसेनेच्या पोस्टरवर झळकले राष्ट्रवादीचे आमदार 

विठ्ठल लांडगे 
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

आशिष यांच्या फेसबुक अकाउंटवर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे छायाचित्र ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आले. तेथे अनिल राठोड किंवा जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही. 

नगरसेवक शिंदे यांच्या जनजागृती मित्रमंडळाच्या 
फ्लेक्‍सवरून शिवसेना उपनेते अनिल राठोड गायब 

नगर : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसतर्फे राज्यात निर्माण झालेल्या नव्या "महाविकास आघाडी' पर्वाचे नगरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी दणदणीत स्वागत केले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे खंदे समर्थक असलेल्या अनिल शिंदे यांच्याच जनजागृती मित्रमंडळ ट्रस्टतर्फे शिंदे यांचे चिरंजीव आशिष यांच्या फेसबुक अकाउंटवर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे छायाचित्र ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आले. तेथे अनिल राठोड किंवा जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप यांना साथ दिल्याची उघड चर्चा करण्यात आली. त्या संदर्भातच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांच्या नावाने सुरू असलेल्या फेसबुक वॉलवर सुरू असलेल्या "कमेंट' युद्धाला "सकाळ'मधून प्रसिद्धी देण्यात आली होती. "शिवसेना नगरसेवकांनीच केली गद्दारी' या मथळ्याखाली हे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यातही पक्षाच्या ज्या नगरसेवकांनी गद्दारी केली, त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविला असल्याची चर्चाही सुरू होती. 

हेही वाचा; लय जोरात... बाळासाहेब थोरात 

गद्दारीच्या आरोपास बळकटी..! 
विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड पराभूत झाले. त्यात शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीच गद्दारी केल्याने राठोड यांना पराभवाचा सामना करावा लागला,'' असा घणाघाती आरोप सुरू आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवक अस्वस्थ होते. एकमेकांकडे ते संशयाने पाहत होते. त्यातच शिवसेना उपनेते व पराभूत उमेदवार राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांच्या नावावर असलेल्या फेसबुक वॉलवर खरमरीत पोस्टद्वारे हा आरोप करण्यात आला. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना आणखी बळकटी मिळाली होती. 

दरम्यान, आज शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांचे चिरंजीव आशिष यांच्या फेसबुक वॉलवर झळकविण्यात आलेल्या पोस्टरमधून राठोड यांच्या जागी आमदार संग्राम जगताप यांचे छायाचित्र झळकल्याने त्यास बळकटी मिळाली आहे. जगताप यांच्यासह या फेसबुक अकाउंटवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महापौर शीला शिंदे व सुरेखा कदम यांचीही छायाचित्रे आहेत. 

हे वाचले का? शिर्डीत महाविकास आघाडीचा जल्लोष! 

शिवसेनेच्या कोणत्याही नगरसेवकाने पक्षासोबत गद्दारी केली नसल्याची भूमिका पक्षाच्या गटनेत्या रोहिणी संजय शेंडगे यांनी त्या वेळी "सकाळ'कडे व्यक्त केली होती. पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी प्रामाणिकपणे केल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, आज झळकलेल्या पोस्टरवरून त्यांच्या वक्तव्याबाबत शंका उपस्थित होत आहेत. 

उपनेते राठोड यांच्यामुळेच शिवसेना टिकली..! 
"विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीत शहर शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे दुर्दैवाने अनिलभैयांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्याच काही नगरसेवकांनी शिवसेनेचे काम न केल्याने पराभव झाला; परंतु आजही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. ज्यांनी नगर शहरात शिवसेनेचा पाया रचला, शिवसेनेचे अस्तित्व टिकवले, ज्यांनी कधीही स्वार्थासाठी शिवसेनेशी गद्दारी केली नाही, अशा अनिल राठोड यांना विसरून तुम्ही कधीही मोठे होऊ शकत नाही,' अशा आशयाची पोस्ट विक्रम राठोड यांच्या नावाने चालविल्या जाणाऱ्या अकांउंटवर करण्यात आली होती. दरम्यान, आता ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांचेच चिरंजीव आशिष यांच्या फेसबुक अकाउंटवर असे पोस्टर झळकल्याने शिवसैनिक भविष्यात नेमके कुठे असतील, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On ShivSena"s poster NCP's MLA