
इस्लामपूर (सांगली) : कोरोना विषाणू संसर्गाचा कहर झालेल्या आणि अत्यंत धोकादायक बनलेल्या धारावी-मुंबई येथून 21 लोक आज अचानक इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्याच्या हद्दीत दाखल झाल्याने प्रशासनाची धांदल उडाली. ऍक्शन मोडमध्ये असलेल्या प्रांत, मुख्याधिकारी यांनी तातडीने यंत्रणा लावल्याने 21 पैकी 20 जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दोघांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील काही लोक मुंबई महापालिकेतील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी रात्री 10 वाजता धारावी येथून हे 21 जण सांगलीला यायला निघाले. हे सर्व मुंबईच्या न्यू धारावी, फ्रॅजिक कॅम्प या भागातील रहिवासी आहेत. काल रात्री उशिरा त्यांना कऱ्हाड येथील चेकपोस्टवर पोलिसांनी अडवले. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने ही बस मागे पाठवण्यात आले. काही अंतरावर मागे जाऊन हे सगळे खाली उतरले आणि बस धारावीला पाठवली आणि हे चालत चालत पुन्हा कऱ्हाडच्या दिशेने आले. काही काळ विश्रांती घेऊन त्यातील चौघे पुढे इस्लामपुरात आले. हे लोक परत येऊन आपणाला घेऊन जातील या आशेने बाकीचे मागेच थांबले होते. नंतर मात्र त्यांनी शेतातून चोरवाटेने मार्ग काढत कासेगावपर्यंत आले. दरम्यान मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांना फोन आला की इस्लामपुरात चार लोक धारावीमधून आलेत. त्यांनी तातडीने माकडवाले समाजाच्या वस्तीत जाऊन त्या चार जणांकडे चौकशी केली असता सगळे मिळून 21 लोक आल्याचे समजताच त्यांचे धाबे दणाणले.
माकडवाले गल्लीत राहणाऱ्या यल्लप्पा सोनकप्पा कुचीवाले याच्या घरी आल्याचे प्रशासनास माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव वाघ, अनिल जाधव त्याठिकाणी दाखल झाले. सुरवातीस शिवराज कुंचिकोरवी व सुरेखा कुंचिकोरवी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस प्रशासनाने सक्तीने चौकशी केली असता त्यांनी कोणतीही शासनाची परवानगी न घेता आल्याचे कबूल केले. पवार यांनी तातडीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे बाकीचे कुठे आहेत याचा माग घेतला. तर हे 16 जण कासेगावमधील सेवा रस्त्याने चालत येत असल्याचे समजले. तर तातडीने कासेगाव पोलिसांना तेथे पाचारण करून हे तिकडे पोहोचले. ते लोक भुकेलेल्या आणि थकलेल्या अवस्थेत होते. त्यांना खाऊ-पिऊ घालून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यातील दोघांना तापाची लक्षणे आढळली. यातील काही लोक वृद्ध तर रक्तदाब आणि मधुमेहाचे रुग्णही होते. या सर्वांना सांगलीला हलविण्यात आले आहे. पैकी एकजण गायब असून तो तुंग येथे असल्याचे किंवा तो सांगलीला पोहोचला असण्याची शक्यता आहे. या व्यक्तीशी संबंधित धारावी येथे एकजण कोरोना पॉझिटिव्ह असून त्या भीतीनेच याने पलायन केल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्याची चौकशी सुरू आहे.
दोघांवर गुन्हा..!
धारावी-मुंबईहून कोणतीही परवानगी न घेता संचारबंदीचे उल्लंघन करून दोघेजण इस्लामपूरात दाखल झालेल्या दोघांच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज दशरथ कुंचिकोरवी (वय 35) व सुरेखा दशरथ कुंचिकोरवी (30) अशी त्यांची नावे आहेत. पालिका कर्मचारी अनिल महादेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या चौघांना इस्लामपूर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी असलेल्या कुचिवाले यांनीच आसरा दिला होता. मुख्याधिकाऱ्यांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केली.पन्नास हजार भाडे देऊन केली बस...
धारावीमध्ये खूपच भयानक परिस्थिती निर्माण झाली असून त्या भीतीने जीव मुठीत धरून इस्लामपूर, सांगली येथे नातेवाईक असल्याने निघून आल्याचे या लोकांनी सांगितले. या सर्वांनी मिळून त्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये भाडे दिले असल्याचे समजले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.