धक्कादायक ! शाळेत मुलांची ऑक्‍सिजन तपासणी करणारे शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह 

NIRANJAN SUTAR
Tuesday, 24 November 2020

त्यामुळे शाळा, विद्यार्थी, गावकरी हादरून गेले आहेत. शाळा 14 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. 

आरग (सांगली) : मिरज पूर्व भागातील बेडग गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी कोरोना संकटानंतर आठ महिन्यांनी शाळा सुरु झाल्या. येथे पहिल्या दिवशी शाळेत मुलांना प्रवेश देण्याआधी त्यांचा ताप आणि ऑक्‍सिजन तपासण्यात आले. ही तपासणी करणारे शिक्षकच कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज सकाळी हाती आला आहे. त्यामुळे शाळा, विद्यार्थी, गावकरी हादरून गेले आहेत. शाळा 14 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. 

याबाबत शाळा प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः कोरोनाचे संकट वाढत असताना 15 मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आला होता. आठ महिने शाळा बंद राहिल्यानंतर सोमवारी नववी, दहावी, अकरावी, बारावीचे वर्ग सुरु झाले. काटेकोर नियम पाळून शाळा सुरु करण्याचे आदेश होते. त्यातील महत्वाचा आदेश हा शिक्षकांची कोरोना तपासणी करून घेण्याचा होता. त्यात लक्षणे दिसणाऱ्या शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी तर लक्षणे दिसत नसलेल्या शिक्षकांची रॅपीड अँटीजेन तपासणी करण्यात येत आहे. 

बेडग येथील एका माध्यमिक शाळेत मात्र धक्कादायक प्रकार घडला. एका शिक्षकाने कोरोनाची तपासणी करून घेतली, मात्र त्याचा अहवाल हाती येण्याआधीच ते शाळेत हजर राहिले. शिक्षकांने सोमवारी दिवसभर शाळेत हजेरी लावली. 400 पैकी 72 विद्यार्थी शाळेत आले होते. विद्यार्थ्यांची ऑक्‍सीमीटरने अक्‍सिजन तपासणी या शिक्षकाने केली. ते शिक्षकांच्या संपर्कातही आले. आज सकाळी त्यांचा अहवाल मिळाला. तो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तत्काळ 14 दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking! Corona positive only teacher who checks oxygen in children at school