धक्कादायक ः नगर जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधित, आकडा गेला चौदावर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

या पॉझिटीव्ह व्यक्तींमध्ये दोन संगमनेरच्या दोन मंकुंदनगरच्या आहेत. एक इंडोनेशियाची तर दुसरी जिबुटी येथील आहे. अशा एकूण सहा व्यक्ती आहेत. बाधित झालेल्या व्यक्ती १७ ते ६८ वयोगटातील आहेत. मुकुंदनगरमधील बाधित व्यक्ती या परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होत्या. त्या भाषांतरकार म्हणून काम करीत होत्या.

नगर - नगर जिल्ह्यात आज आणखी कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. दररोज येणाऱ्या रिपोर्टमुळे काळजाचे ठोके वाढत आहेत. आज आलेल्या ५१ जणांच्या रिपोर्टमध्ये तब्बल सहा व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता चौदावर गेला आहे.

या पॉझिटीव्ह व्यक्तींमध्ये दोन संगमनेरच्या दोन मंकुंदनगरच्या आहेत. एक इंडोनेशियाची तर दुसरी जिबुटी येथील आहे. अशा एकूण सहा व्यक्ती आहेत. बाधित झालेल्या व्यक्ती १७ ते ६८ वयोगटातील आहेत. मुकुंदनगरमधील बाधित व्यक्ती या परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात होत्या. त्या भाषांतरकार म्हणून काम करीत होत्या. मात्र, त्या दोन्ही परप्रांतीय आहेत. एक मूळ राजस्थानातील आहे तर दुसरी मध्यप्रदेशातील भोपाळची आहे.

या परदेशी व्यक्तींमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतो आहे. त्यांच्यामुळेच जामखेड येथील तिघांना बाधा झाली होती. त्यांच्या बूथ हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. एकूण चौदा व्यक्ती असल्या तरी जिल्ह्यात आढळलेली पहिली कोरोना बाधित व्यक्तीला डिस्चार्ज मिळाला आहे. सुदैवाने अद्यापि कोणाचा मृत्यू झालेला नाही. ही दिलासा देणारी बाब आहे. 

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. बाधित व्यक्ती एक तर परदेशातून आल्या आहेत किंवा थेट त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking Six more corona patients in Ahmednagar district