धक्कादायक ! भिलवडी, ब्रह्मनाळमध्ये नेलेली बोट परत मागवण्याचा प्रकार

flood
flood

सांगली ः कृष्णाकाठी महापुराची धास्ती कायम असताना आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कृष्णा नदीच्या काठावरील भिलवडी आणि गेल्यावर्षीच्या महापुरात 17 जणांना जलसमाधी मिळालेल्या ब्रह्मनाळ गावात आजच दाखल झालेल्या नव्या बोटी प्रशासनाने कोणतेही कारण न सांगता परत मागवण्याचा प्रकार केला. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत बोटी परत देण्यास नकार दिला. यामागे नेमके काय कारण आहे, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. बोटी परत मागवण्याचा आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते कारण जाहीर करावे, अशी मागणी या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे. 

गेल्यावर्षी महाप्रलयकारी महापूर आला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तोकडी असल्याचे स्पष्ट झाले होते. लोक गावात अडकले असताना बोटी मिळत नव्हत्या. ब्रह्मनाळ गावात एका बोटीतून लोक गावाबाहेर जात असताना ती पलटी झाली आणि त्यात तब्बल सतरा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ती अत्यंत धक्कादायक घटना आजही ताजी आहे. त्या गावात बोट पोहोच करायला तब्बल एक वर्ष लागले, हेही धक्कादायकच. ती आज सकाळी पोहचली. त्याआधी कृष्णा नदीत या बोटीची तपासणी करण्यात आली.

त्यासाठी मुंबईतून मरीन अधिकारी आले होते. स्वतः जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी बोट तपासून घेतली होती. दोन बोटी तयार आहेत, आणखी पंधरा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन तयार बोटी आधी भिलवडी आणि ब्रह्मनाळ या गावी पोहचल्या पाहिजेत, अशी जिल्हा परिषद प्रशासनाची स्वच्छ भूमिका होती. त्यानुसार सकाळी पलूसचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांना जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात आल्या. बोटी पाठवत आहे, व्यवस्थित उतरवून घ्या, अशा सूचना आल्यानंतर गावात एकच जल्लोष झाला. 


ब्रह्मनाळकरांनी गेल्यावर्षीचे दुःख विसरून आज नव्या बोटीचे जंगी स्वागत केले. हलगी लावून नवी बोट गावात आणली गेली. जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह गावातील मान्यवर मंडळी तेथे उपस्थित होती. बोटीचे पूजन झाले. लोकांनी निश्‍वास सोडला, मात्र तोवर काहीतरी घडले... हे काहीतरी म्हणजे काय, याचे उत्तर अद्याप कुणीही दिलेले नाही. जिल्हा प्रशासनाने बोटी परत मागवल्या आहेत, असा निरोप गटविकास अधिकाऱ्यांनी दिला. त्याचे कारण काही सांगितले नाही. त्यावर लोक चिडले. त्यांनी बोटी परत देण्यास नकार दिला. त्या थांबवून घेतल्या. भिलवडी ग्रामपंचायतीने तर बोट मिळाली, असो पोहोच दिली. या एकूण प्रकाराबद्दल लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत "नेमके काय घडले, हे सांगा', अशी आग्रही मागणी केली आहे. बोटी दोन्ही गावात असून त्या परत दिल्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. 

 

""सतरा लोकांचा बळी गेल्यानंतर ब्रह्मनाळमध्ये एक वर्षाने नवी बोट आली आहे. इथल्या लोकांनी या बोटीचे जंगी स्वागत केले. त्यानंतर दहाव्या मिनिटाला बोट परत मागवण्याचे कारण काय? जिल्हा प्रशासनाने याचे उत्तर दिले पाहिजे. लोकांच्या भावनांशी आणि सुरक्षिततेशी खेळ मांडला आहे का?'' 

सुरेंद्र वाळवेकर, सदस्य जिल्हा परिषद 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com