सांगलीत पाण्यासाठी टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

सहा महिने सतत तक्रारी करुनही पिण्याचे पाणी येत नाही. मात्र त्याची बिले पाठवली जातात. यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेच्या प्रभाग 18 मधील नागरिकांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

सांगली : सहा महिने सतत तक्रारी करुनही पिण्याचे पाणी येत नाही. मात्र त्याची बिले पाठवली जातात. यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेच्या प्रभाग 18 मधील नागरिकांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. आंदोलनस्थळी आलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बाचाबाचीचा प्रकार झाला. महापौर आणि आयुक्तांनी यात लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महापौर गीता सुतार यांनी आंदोलनस्थळी जाऊन नागरिकांची भेट घेत त्यांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. 

महापालिकेच्या प्रभाग 18 मधील शामराव नगरात गेले सहा महिने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. याबाबत नगरसेविका नसिमा नाईक, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी वारंवार पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे. उलट पाणी मिळत नसताना पाण्याची बिले मात्र महापालिकेने पाठवली. त्यामुळे आज नागरिकांचा संताप अनावर झाला. पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ सकाळी साडे अकराच्या सुमारास नगरसेविका नसिमा नाईक, रज्जाक नाईक आणि परिसरातील नागरिक थेट आकाशवाणी मागे उभारलेल्या नवीन पाण्याच्या टाकीवर चढले आणि त्यांनी पाणी द्या, पाणी द्या अशी घोषणाबाजी सुरु केली. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या शोलेस्टाईल आंदोलनाची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. तेथे नागरिकांनी त्यांना जाब विचारला.

यावेळी अधिकाऱ्यांशी त्यांची बाचाबाची झाली. नगरसेविका नसिमा नाईक म्हणाल्या, गेले सहा महिने पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यालाही दाद दिली नाही. त्यामुळे आज अशा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. महापौर आणि आयुक्तांनी यात लक्ष घालून प्रभाग 18 मध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा. 
आंदोलनात जावेद नदाफ, सुमित शिंदे, रोहित जगदाळे, सलमा मुजावर, मन्सूर नाईक, मुन्ना शेख, निलेश जगदाळे आदी नागरिक सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sholestyle agitation by climbing on the tank for Sangli water