माधवनगरला पोलिस चौकीजवळ दुकान फोडले...तंबाखूचे पोते, सिगारेट पाकिटे लांबवली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सांगली-  माधवनगर (ता. मिरज) येथील पोलिस चौकीसमोरील पुष्पा एंटरप्रायझेस हे दुकान फोडून चोरट्यांनी तंबाखूचे पोते, सिगारेट पाकिटे व रोख तीन हजार रुपये असा 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुकानमालक रवींद्र गजानन मेंडगुले (वय 54, रा. गावभाग, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. 

संजयनगर पोलिस ठाणे हद्दीतील माधवनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. किरकोळ चोऱ्यांसह दुकाने फोडली जात आहेत. तीन दिवसांपूर्वी साखर कारखान्यासमोरील बेकरी फोडून रोख रक्कम व बेकरीचे पदार्थ चोरट्यांनी लांबवले होते. त्यानंतर चोरट्यांनी चक्क माधवनगरातील बसस्थानकाजवळील पुष्पा एंटरप्रायझेस हे दुकान चोरीसाठी निवडले. माधवनगरात बसस्थानकाजवळ असलेले दुकान पोलिस चौकीपासून अवघ्या शंभर फुटांच्या आतच आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास या दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी वाकवून दरवाजा उघडला. त्यानंतर आतमध्ये प्रवेश केला. आतील पैशाच्या गल्ल्यातील रोख तीन हजार रुपये, गाय छाप तंबाखूचे पोते, सिगारेटची पाकिटे असा सुमारे 25 हजार रुपयांचा माल घेऊन पलायन केले. 

सकाळी सव्वा सातच्या सुमारास दुकान फोडल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी मालक श्री. मेंडगुले यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिस चौकीपासून शंभर फुटांच्या परिसरातील दुकान फोडल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. तसेच चौकीसमोरील दुकान फोडल्यामुळे पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shop blown up near police chowki in Madhavnagar .