Nipani : 'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'च घ्यावा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'च घ्यावा?

'स्वेटर' घ्यायचे की 'रेनकोट'च घ्यावा?

निपाणी : तशी आपल्याकडे थंडीची चाहूल नवरात्रीपासूनच लागते. दसऱ्यापर्यंत सकाळी गवतावर दव दिसू लागते. पहाट धुक्याची दुलई पांघरू लागते. दिवाळी संपता संपता बऱ्यापैकी गुलाब थंडीचा मौसम आलेला असतो. त्यामुळे वर्षभर कपाटात जपून ठेवलेले स्वेटर्स, ब्लॅकेट, शाल असे गरम कपडे बाहेर काढले किंवा खरेदी केले जातात. पण यंदा विपरीतच घडत असून ऐन हिवाळ्याच्या दिवसांत पावसाच्या सरी कोसळत असल्याने आता थंडीसाठी स्वेटर की पावसापासून वाचण्यासाठी रेनकोट किंवा छत्री घ्यावी, असा प्रश्न निपाणी परिसरातील नागरिकांना सतावत आहे.

मागील काही दिवसांपासून निपाणी तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सध्या शेतात ऊस उभे आहेत. काही ठिकाणी ऊसाची तोडणी होऊन कारखान्याला जात आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उसाचे शेत भिजून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक महिन्यांपासूनची मेहनत, त्यांनी बियाणे, खते, किटकनाशकांसाठी केलेला खर्च हे सारे व्यर्थ गेले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मागील अनेक महिन्यांपासून वाढवलेला शेतात रोगराईपासून वाचविलेला ऊस, भाजीपाला आता अवकाळी पावसामुळे जमिनदोस्त होऊन सडताना बघावा लागत आहे. ग्रामीण भागात हे चित्र असताना शहरी भागातही नागरिक गोंधळले आहेत.

घराबाहेर पडताना अनेकांना आता रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी लागत आहे. दिवाळीनंतर ठिकठिकाणी लोकरी कपड्यांची दुकाने सजू लागतात. यंदाही अशी दुकाने सजली असली तरी येथे ग्राहकांचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे दिवस थंडीचे नसले तरी या व्यापाऱ्यांचा व्यवसाय थंड झाला आहे. जणू यंदा थंडीच नाही, असे वाटत आहे. मागील काही दिवसापासून आकाशात सतत ढग असल्याने थंडीचा पत्ताच नाही. उलट घराघरांत पंखे आणि कुलर्स सुरू आहेत. प्रत्येक ऋतूचे निश्चित ठोकताळे असतात. भारतात साधारणतः जून ते सप्टेंबरपर्यंतचे महिने पावसाचे मानले जातात. त्यानंतर जानेवारीपर्यंत हिंवाळा असतो. त्यातही नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने अधिकच थंडीचे मानले जातात. यंदा दिवाळीदरम्यान काही दिवस चांगली थंडी होती. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्याही पेटल्या. पण अचानक आलेल्या पावसाने शेकोट्या विझविल्या असून थंडीलाही पळवून लावले आहे. त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घ्यायचे की रेनकोट, छत्री, असा प्रश्न नागरिकांना पडला असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हा ऋतू कोणता?

सध्या पहाटे तापमान थोडे कमी असले तरी नऊ वाजल्यानंतर प्रखर उन्ह पडायला लागते. त्यामुळे उन्हाळ्यासारखे वातावरण होते. दुपारपर्यंत हे वातावरण कायम असताना अचानक पाऊस येतो. पण हा पाऊस काही वेळाने निघून गेल्यावर पुन्हा उकाडा जाणवू लागतो. रात्री उन्हाळ्यासारखेच वातावरण असते. त्यामुळे सध्या हिवाळा, उन्हाळा की पावसाळा यापैकी नेमका कोणता ऋतू सध्या सुरू आहे, हेच समजेनासे झाले आहे.

loading image
go to top