नदीतीर अन्‌ डोंगररांगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कृष्णा-वारणा नदीकाठचा पश्‍चिम भाग आणि दुष्काळी पूर्व भाग असे जिल्ह्याचे दोन भाग पडतात. निसर्गाने मोठा असमतोल राखलेल्या या भागांत काही पर्यटन स्थळे मात्र भुरळ घालणारी आहेत. काही धार्मिक स्थळे असून काही डोंगररांगातील निसर्गरम्य ठिकाणे आहेत. एक दिवसाच्या सहलीसाठी ती उत्तम पर्याय आहे. 

औदुंबर
पलूस तालुक्‍यातील श्री क्षेत्र औदुंबर सुमारे सहाशे वर्षांपूर्वी वसले असावे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास केल्याचे सांगितले जाते. कृष्णा नदीचा औदुंबरचा डोह नजरेत साठवणे आनंददायी असते. श्रावणात परिसर हिरवाईने नटून जातो. औदुंबर कोल्हापूरपासून ५० तर सांगलीपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे. सर्व ठिकाणाहून बसची सोय असून रस्ता उत्तम आहे. निसर्गरम्य ठिकाण, नौकानयनची सोय आहे. शिवशंकरानंद आश्रम, ब्रह्मानंद आश्रम, भुवनेश्‍वरी देवी मंदिर आदी ठिकाणे पर्यटकांसाठी आनंद देणारी आहेत. येथे भक्त निवास आहे. त्यामुळे राहण्याची सोय होते. 

रामलिंग बेट
वाळवा तालुक्‍यातील बहे येथील रामलिंग बेट आकर्षक आहेत. कृष्णा नदीवर पूल आहे. त्यालगत ऐतिहासिक रामलिंग बेट आहे. तेथे बोटिंगची सोय आहे. प्रभू रामचंद्र व सीतामाता वनवास भोगून परतताना स्नानासाठी येथे थांबल्याची आख्यायिका आहे. शिरटे गावात सीतामातेचे मंदिर आहे. रामचंद्रांनी स्नान करून वाळूचे शिवलिंग स्थापन केले. मारुतीच्या बाहूमुळे या गावाचे नाव बहे पडल्याची आख्यायिका आहे. रामायणात या गावाचा उल्लेख येतो. श्री समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी येऊन गेल्याचे सांगितले जाते.  

मल्लिकार्जुन देवस्थान
वाळवा तालुक्‍यातील येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन देवस्थान हजारो वर्षांपूर्वी डोंगरावर वसलेले आहे. करवीर माहात्म्य व काशीखंड या ग्रंथात या देवस्थानाचा उल्लेख आहे. 
श्रावणातील प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. शेवटच्या सोमवारी येथे यात्रा भरते. पुणे-बंगळूर महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

दंडोबाचा डोंगर
सांगली, मिरज शहरापासून सर्वात जवळचे उत्तम पर्यटनाचे ठिकाण म्हणजे दंडोबाचा डोंगर. झाडा-झुडपांनी बहरलेला डोंगर, त्यावरील तळी पठारावरील गवत, रानफुले आनंद देतात. वनभोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर दंडोबा उत्तमच. येथे छोटी गुहा असून गुहेत छोटे मंदिर आहे. श्रावण सोमवारी यात्रा भरते. मिरजेपासून हे ठिकाण २५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे गेल्या काही वर्षांत पर्यटकांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तेथून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर कुकटोळी गावातून गिरलिंग डोंगराकडे रस्ता जातो. येथील गुफा आणि निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करतेय.   

शुकाचार्य 
खानापूर-आटपाडी तालुक्‍याच्या सीमेवरील हे पर्यटन केंद्र दुष्काळी भागाची शोभा वाढवणारे आहे. यावर्षी अद्याप येथे पाऊस पडलेला नाही; मात्र श्रावणात येथे एक दिवस व्यतीत करणे आनंददायी असते. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा भाग भुरळ घालतो. सांगलीपासून ७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. भिवघाटातून शुकाचार्यचा रस्ता जातो. श्रावण सोमवारी येथे गर्दी असते.

Web Title: Shravan Tourism Special story