esakal | श्री गणेशाचे विसर्जनासाठी यंदाही शेतीशाळेत तळे
sakal

बोलून बातमी शोधा

श्री गणेशाचे विसर्जनासाठी यंदाही शेतीशाळेत तळे

पालिकेच्या माध्यमातून गणपती, दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी बुधवार नाका परिसरातील तळे निश्‍चित करण्यात आले आहे. या ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद पसरण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. 

श्री गणेशाचे विसर्जनासाठी यंदाही शेतीशाळेत तळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः पालिकेच्या माध्यमातून गणपती, दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी मुख्य विसर्जन ठिकाण म्हणून यंदा पुन्हा गतवेळचे बुधवार नाका परिसरातील तळे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यासाठी जागेची स्वच्छता, खोदकाम, प्लॅस्टिकचा कागद पसरणे या प्राथमिक कामास प्रारंभ झाला आहे. 

भाविकांनी श्री गणेशाचे स्वागत धुमधडाक्‍यात केले आहे. घराघरांत तसेच सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गुरुवारी (ता. पाच) गौरीचे आगमन होणार आहे. त्यानंतर शनिवारी (ता. सात) गौरी-गणपतींच्या विसर्जनाचा दिवस आहे. आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पालिकेने पूर्वीच्या जलतरण तलावाबरोबरच कृत्रिम तळ्यांची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये सदरबझार दगडी शाळा, कल्याणी हायस्कूलनजीक, हुतात्मा स्मारक आदींचा समावेश आहे. याबरोबरच मंगळवार तळे, मोती तळे, विविध पेठांमधील चौकाचौकांत तात्पुरत्या स्वरूपाचे हौद ठेवण्यात येणार आहेत. 
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती व दूर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनासाठी मुख्य विसर्जन ठिकाण बुधवार नाका येथील जिल्हा परिषदेच्या शेतीशाळेतील जागेत निश्‍चित करण्यात आले आहे. पालिका आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून या तळ्याचे खोदकाम, प्लॅस्टिक कागद पसरणे ही प्राथमिक कामे सुरू करण्यात आली आहेत. या तळ्याची सुमारे 50 मीटर लांबी, 25 मीटर रुंदी तसेच 12 मीटर खोली आहे. त्यामध्ये सुमारे 70 लाख लिटर इतकी पाणी साठवण क्षमता असल्याची माहिती बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. त्याबरोबरच विसर्जन तळ्यानजीक मंडप, विद्युत यंत्रणा अशा सुविधा असणार आहेत. पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवसांपासून पालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 


औषध फवारणीबाबत मंडळांची तक्रार 

गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना साथीच्या रोगाची लागण होऊ नये, यासाठी सर्वच प्रभागांमधील रस्त्यांवर जंतुनाशक औषधांची फवारणी तसेच पावडर मारण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने जंतुनाशक फवारणीसाठी आणलेले यंत्र सुव्यवस्थित नसल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक मंडळांच्या ठिकाणी फवारणी झाली नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांची आहे.  

loading image
go to top