सांगली महापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडू : मनसेचा इशारा

बलराज पवार
Saturday, 6 February 2021

महापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आज दिला.

सांगली : कर्नाटकच्या सीमेवरील भागात मराठी भाषेचा अपमान केला जात आहे. मराठी भाषकांची गळचेपी सुरू आहे. यावरून मनसे आक्रमक झाली असून हा अपमान सहन केला जाणार नाही, महापालिका क्षेत्रातील कन्नड शाळा बंद पाडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी आज दिला.

श्री. सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. ते म्हणाले,""मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही असते. कर्नाटकातील मराठी शाळा आणि मराठी माणसांवर तेथील सरकार दबाव टाकत आहे. त्यांची गळचेपी सुरू आहे.

काही जिल्ह्यातील मराठी शाळा बंद पाडण्यात आल्या. राज्य महामंडळाच्या एस. टी.वर उभे राहून कानडी धिंगाणा घातला गेला. मराठीत असलेल्या नामफलकास काळे फासले. या बाबी निंदनीय आहेत. तेथील मंत्री सांगली, सोलापूर कर्नाटकात सामील करणार अशा वल्गना करत आहेत.'' 

ते म्हणाले,""कर्नाटकातील मराठी माणसावर व मराठी भाषेवर अन्याय झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. सीमाभागात इकडे कन्नड लोकं आहेत. आम्ही त्यांना कधी त्रास देत नाही. महापालिका क्षेत्रासह सीमाभागात कन्नड शाळा आहेत त्या बंद करू. कन्नड भाषाही बंद करू.

जरी सरकार झोपले असले तरी मनसे इथे मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरणार हे कन्नडगिनी विसरू नये. याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यातील आस्थापना, हॉटेल्स, हॉस्पिटलवर असलेले कन्नड व इतर भाषेतील फलक आठ दिवसांत काढून टाकावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने काढेल याची खबरदारी घ्यावी.'' 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shut down Kannada schools in Sangli Municipal Corporation area: MNS warning