आटपाडीत घराची भिंत कोसळून चिमुरड्या बहिणींचा जागीच मृत्यू ...दिवसभर परिसरात मुसळधार पाऊस 

नागेश गायकवाड
Friday, 18 September 2020

आटपाडी (सांगली)-  आटपाडी तालुक्‍यात आज दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे आटपाडीच्या शुक ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आटपाडीतील सागर मळ्यात माळवदी घराची भिंत कोसळून त्याखाली सापडलेल्या दोन सख्ख्या लहान बहिणींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

आज शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची संततधार चालू होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. सागरमळा येथील प्रकाश कुंभार यांचे राहते माळवदी घर मुसळधार पावसामुळे कमकुवत बनले होते. पावसामुळे कुटुंबिय घरातच थांबून होते. दुपारी चारच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या कडेला बसलेल्या दोन चिमुरडीच्या अंगावरच भिंतीचा ढिगारा पडला. दोघींनी जीव वाचवण्याची कोणतीच संधी मिळाली नाही. ढिगाऱ्यात दोघी गाडल्या. भिंत पडल्यानंतर इतरांनी आरडाओरड केला. त्यामुळे परिसरातील लोक मदतीसाठी धावले. लोकांनी तातडीने भिंतीचा ढिगारा बाजूला केला. 

तेव्हा त्याखालील चित्र भयानकच होते. वैशाली प्रकाश कुंभार (वय-3) आणि तृप्ती प्रकाश कुंभार (वय-2) या दोघी सख्ख्या बहिणीचा गुदमरून मृत्यू झाला होता. प्रकाश कुंभार यांना दोनच मुली होत्या. दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आटपाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मुलींचे पार्थिव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. 
दरम्यान दुपारनंतर पाऊस वाढल्यामुळे आटपाडीच्या शुभ ओढ्याचे पाणी ही प्रचंड वाढले होते. ग्रामपंचायत समोरील पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीसांनी पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद केली होती तसेच ओढ्यालगत राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sisters die on the spot when wall of house collapses in Atpadi