सहा भावंडे आणि 32 जणांचे गोकुळ 

Six brothers & 36 member's family staying together
Six brothers & 36 member's family staying together

सांगली : एकत्र कुटुंब पद्धती अस्तंगत होऊन आता शहराप्रमाणेच मी आणि माझी बायको-मुले या चौकटीतील कुटुंबेच आता गावांचा भाग झाली आहेत. अशा काळात नवे खेड (ता. वाळवा) येथील शिवाजी पाटील यांचे सहा भावांचे एकत्रित कुटुंब आजही जुन्या गावगाड्याच्या काही पाऊलखुणा सांभाळत आहे. "कष्ट हेच भांडवल' या श्रममंत्रातून या कुटुंबाने केलेली प्रगती अनुकरणीय आहे.

केवळ शेतीवरचे अर्थकारण संपुष्टात येत गेले तसे गेल्या दोन दशकांत खेड्यातील कुटुंबे विभक्त होत गेली. गेल्या दोन दशकांत ही एकत्र कुटुंब पद्धती जवळपास संपुष्टात आली. जमिनीचे व घराचे तुकडे होऊ लागले आणि आता गावात एखाद दुसरे कुटुंब आता एकत्र कुटुंब म्हणून राहतेय. मात्र या काळातही नवे खेडच्या पाटील कुटुंबातील सहा भावंडे एकत्र राहतात. 

कै. रंगराव मारुती पाटील व श्रीमती गंगुबाई रंगराव पाटील यांचे हे कुटुंब. त्या दांपत्याला शिवाजी, तानाजी, सर्जेराव, विलास, प्रकाश, सहदेव ही मुले तर सावित्री एक मुलगी. गंगुबाई यांनी नेटाने सात मुलांचा संसार सांभाळला. मोठा मुलगा शिवाजी हाताखाली आला आणि त्याच्या जोडीने त्यांनी शेतीची प्रगती सुरू केली. स्वतः ऊस तोडून गळीताला नेण्यापर्यंतची कामे त्यांनी केली. सर्व भावंडे शेतात काबाडकष्ट करीत.

सोयीसाठी म्हणून पुढे या कुटुंबाने गावातून आपला मुक्कामच शेतात नेला. गरिबीचे चटके जवळून अनुभवले. मोठा मुलगा शिवाजी याला हुतात्मा साखर कारखान्यात दरम्यानच्या काळात नोकरी मिळाली. मग इतर भावांनी मजुरीची कामे खंडाने करणे, शेतजमिनी खंडाने करणे अशा पद्धतीने कामास सुरवात केली.

सहा बंधूंची शिक्षण जेमतेम सातवी आठवी पर्यंत झाली. परंतु शेतात कष्टाची तयारी ठेवली. अल्पावधीतच त्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्यातूनच त्याने 87 व 88 मध्ये दोन ट्रॅक्‍टर खरेदी केले. पुढे दहा-बारा वर्षांत 19 एकर जमीन खरेदी केली. शेतात प्रशस्त बंगला बांधला. सध्या या कुटुंबातील लहान-मोठे 32 सदस्य आहेत. 

या कुटुंबाची एकूण बावीस एकर शेती आहे. सर्व शेतकामे घरचेच सदस्य करतात. त्यासाठी आदल्या दिवशीच सारे मिळून एकत्र कामाचे नियोजन करतात. सकाळी दोन महिला, रात्री तीन महिला स्वयंपाकघरात राबत असतात. अन्य महिलांकडे गाई, म्हशी, बैले अशा सुमारे 40 जनावरांची जबाबदारी असते. गोठ्यातून आजही दररोज 40 लिटर दूध संकलन होते. त्याची जबाबदारी आजही 80 वर्षांच्या गंगुबाई पाहतात. आजही त्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतच आहेत. सुना, मुले, नातवंडे त्यांचा शब्द ओलांडत नाहीत.

पहाटे पाचला या कुटुंबाचा दिवस सुरू होतो. भल्या पहाटे घरात सर्वच सदस्यांची लगबग सुरू असते. पुरुष मंडळी आपापल्या सोयीने जेवण करतात, मात्र दररोज रात्री महिला वर्ग मात्र एकाच पंगतीत असतो. कुटुंबाची ही एकजूट त्यांच्या प्रगतीची प्रेरणा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com