७६ वर्षांच्या आजींच्या ब्लॉगचे वाचक सहा लाख

संभाजी थोरात
Thursday, 21 February 2019

मुलाने नऊ वर्षांपूर्वी लॅपटॉप घेऊन दिला. तेव्हा 
मला तो नकोसा झालेला. हे आपलं काम नाही, आपण हे करू शकणार नाही, असं वाटत होतं; पण हळूहळू प्रयत्न केला आणि हाच लॅपटॉप माझा सोबती बनला आहे. त्याच्या माध्यमातून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. मला अनेक मित्र मिळाले. माझे कुटुंब विस्तारले.
- वसुधा चिवटे, ब्लॉग लेखिका

कोल्हापूर - शिकण्यासाठी वय आड येत नाही. मनाची तयारी असेल तर माणूस कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. अशीच आगळीवेगळी किमया साधली आहे, राजारामपुरी आठव्या गल्लीतील वसुधा श्रीकांत चिवटे या ७६ वर्षांच्या आजींनी. आपले अनुभव, ज्ञानाचा लाभ लोकांना व्हावा, या उद्देशाने व विरंगुळा म्हणून त्यांनी सुरू केलेल्या ‘वसुधालय’ या ब्लॉगला चक्क सहा लाखांवर वाचक मिळाले आहेत. त्यांचे हे प्रयत्न तरुणाईला प्रेरणादायी असेच आहेत. 

सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे. सोशल मीडियाचा वापर तरुणाई अधिक करते. मात्र, त्यावर कडी केली आहे, चिवटे आजींनी. वसुधा चिवटे यांचा मुलगा अमेरिकेत राहतो. त्याच्यासोबत बोलण्यासाठी त्यांना मुलाने लॅपटॉप घेऊन दिला. सुरुवातीला आजीबाईंना हे आपलं काम नाही. जमणार नाही, असे वाटले. मात्र, हे जमल्याशिवाय आपल्या मुलाशी बोलता येणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू केले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्या लॅपटॉप वापरायला शिकल्या. त्यानंतर त्यामध्ये त्यांना गोडी वाढू लागली.

आपल्याजवळील ज्ञान लोकांपर्यंत पोचवणं शक्‍य असल्याचे लक्षात येताच त्यांनी ‘वसुधालय’ नावाने ब्लॉग सुरू केला. या ब्लॉगच्या माध्यमातून रेसिपीज, आयुष्यात आलेले अनुभव, त्या मांडू लागल्या. तसेच त्यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या रांगोळ्याही त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवल्या. 

हळूहळू ब्लॉगची लोकप्रियता वाढली आणि पाहता पाहता ही वाचकसंख्या सहा लाखांवर पोचली आहे. सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने कसा वापर करता येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. आज मला हे जमणार नाही. मी ते करणार नाही, असे म्हणणारे अनेक जण आजूबाजूला पहायला मिळतात. मात्र, वयाच्या ७६ व्या वर्षी जिद्दीने काम करून चिवटे आजींनी सर्वांनाच अवाक केले आहे. तसेच कोणत्याही कामामध्ये वय आडवे येत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले आहे.

मुलाने नऊ वर्षांपूर्वी लॅपटॉप घेऊन दिला. तेव्हा 
मला तो नकोसा झालेला. हे आपलं काम नाही, आपण हे करू शकणार नाही, असं वाटत होतं; पण हळूहळू प्रयत्न केला आणि हाच लॅपटॉप माझा सोबती बनला आहे. त्याच्या माध्यमातून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. मला अनेक मित्र मिळाले. माझे कुटुंब विस्तारले.
- वसुधा चिवटे,
ब्लॉग लेखिका

ब्लॉगचा पत्ता : https://vasudhalaya.wordpress.com/


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six lakh readers of 76 - year-old grandmothers blog