सहा वर्षे खदखदत होता त्याच्या डोक्‍यात सूड... 

 For six years he was thinking of taking revenge
For six years he was thinking of taking revenge
Updated on

धोंडेवाडीतील विद्याराणी घोरपडे यांचा हिवरेतील शिंदे कुटुंबात विवाह झाला. पहिले काही दिवस संसाराचा गाढा चालला होता. सन 2009 मध्ये विद्याराणी यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली...शिंदे कुटुंबीयांनी विद्याराणीच्या माहेरी न कळवता परस्पर अंत्यसंस्कार करून रक्षाविसर्जना आधी माहेरच्यांना माहिती दिली अन्‌ तिथं संशय निर्माण झाला. तेव्हापासून घोरपडे व शिंदे या दोन कुटुंबात वाद निर्माण झाला. त्यानंतर शिंदे कुटुंबीयांवर विवाहितेचा छळ केल्याचा खटला दाखल झाला. मात्र त्यातून हे कुटुंब निर्दोष सुटले. त्यानंतर अस्वस्थता वाढली. घोरपडे कुटुंबीयांपैकी सुधीरने आपल्या बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांचा बदला घेण्याचे ठरवले...सहा वर्षे त्याच्या मनात सूड थैमान घालत होता; आणि तो दिवस होता 21 जून 2015 चा...

या दिवशी हिवरे गाव राज्यभरात चर्चेत आले ते येथील तिहेरी खून प्रकरणामुळे. दिवसा ढवळ्यात घरातील पुरुष शेतीच्या कामागवर गेले असताना सुधीर आणि त्याचा मित्र रवींद्र कदम हे दोघे शिंदे वस्तीवर गेले. येथे ब्रह्मदेव तातोबा शिंदे व जनार्दन शिंदे यांची शेजारी घरे आहेत. जनार्दन शिंदे यांचा मुलगा बळवंतशी धोंडेवाडीतील विद्याराणी घोरपडे हिच्याशी विवाह झाला होता. मात्र येथे या दोघांची मोठी गफलत झाली. बहिणीचे सासर समजून त्यांनी बहिणीच्या चुलत सासऱ्यांच्या घरी प्रवेश केला. आधी त्यांनी फॉरेस्टची मोजणी करण्यास आल्याचे सांगून पाण्याची बाटली भरून मागितली. घरी पुरुष नसल्याची खात्री केली. पाणी घेऊन गेल्यानंतर दहा मिनिटांनी ते परत आले. चाकू हातात धरून प्रभावती व सुनीता यांना धमकावले. त्यानंतर निर्घृणपणे गळे चिरले. नंतर निशिगंधाकडे मोर्चा वळवला. त्यांचाही गळा चिरून खून करण्यात आला. 

निष्पापांचा गेला बळी... 
विवाहितेच्या मृत्यूस जबाबदार संबंधित व्यक्‍ती त्यावेळी मळ्यात न राहता गावात रहात होते. त्या मळ्यातील घरात शिंदे कुटुंबीयांचे चुलत नातेवाईक रहात होते. त्यावेळी घरात असलेल्या तीन निष्पाप महिलांचा विवाहितेच्या आत्महत्येशी कोणाताही संबंध नव्हता. मात्र आरोपींनी त्याच घराण्यातील महिला समजून मायलेकीसह तिघांची चाकूने गळे चिरून हत्या केली. त्यामुळे "केलं कुणी अन्‌ भोग कुणाला !' अशी संतप्त प्रतिक्रिया हिवरे गावात उमटली होती. 

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती..! 
निष्पापांचा बळी गेल्यानंतर जिल्हाच नव्हे, तरा राज्याला हादरून सोडले होते. संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त झाले होते. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली. निष्पाप महिलांना न्याय देण्यासाठी खानापूर तालुक्‍यात आंदोलने झाली होती. त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्तीची मागणी पूर्ण केली. ग्रामस्थांनी या निवडीनंतर जल्लोष केला होता. ऍड. निकम यांनीही यासाठी मोठी मेहनत घेत पुरावे गोळा करून न्यायालयासमोर दोघांनी थंड डोक्‍याने नियोजनबद्ध खून केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने आज ऐतिहासिक असा निर्णय दिला. 

निकालानंतर गावकऱ्यांनी केला सत्कार 
या खटल्याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून होते. मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर हिवरे (ता. खानापूर) नागरिकांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. पाच वर्षांनंतर शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळाला, अशी भावनाही व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांनी ऍड. निकम यांना फेटा नेसून त्यांचा सत्कार केला. 

सूरजची साक्ष महत्त्वाची ठरली.... 
घटना पाहून भयभीत झालेला सुनीताचा मुलगा सूरज (वय 12) पळत शेजारील एक किलोमीटरवरील वस्तीवर गेला. लोकांना घटनेची माहिती देताच लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लोक येत आहेत अशी चाहूल लागल्याने हल्लेखोर पसार झाले, ही सारी हकीकत त्या मुलाने न्यायालयासमोर मांडली. हत्या होता डोळ्याने पाहिल्याची भावनिक साक्ष त्यांनी दिली. हीच साक्ष न्यायालयात महत्त्वपूर्ण मानण्यात आली. 

कोल्ड माईंडेड मर्डर ः ऍड. निकम 
सहा वर्षे थंड डोक्‍याने नियोजनबद्ध केलेला हा खून आहे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले. सुधीर घोरपडे याने बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा खून केला. तरुण वय असले तरी सहा वर्षे थंड डोक्‍याने सुडाची भावना डोक्‍यात ठेवणे हे गंभीर आहे. सहा वर्षांनंतर निर्घृण पद्धतीने केलेला खून बदल्याची आग किती खदखदत होती, हेच यातून दिसून येते. हा खून नियोजनबद्ध पद्धतीने केल्याने आरोपी परिपक्व आहेत, हे सिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या या क्रौर्यतापूर्ण कृत्यासाठी त्यांना मृत्यूदंडच व्हावा, अशी मागणी ऍड. निकम यांनी न्यायालयासमोर केली होती. त्यानंतर न्यायालयाने साक्षी पुराव्याआधारे दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. त्यात कोणतीही सूट मिळणार नसल्याचेही आदेश निकालात देण्यात आले. सांगली न्यायालयाने दिलेला हा ऐतिहास निर्णय असल्याचे ऍड. निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com