आरटीई प्रवेशाकडे पालकांनी फिरवली पाठ

मिलिंद देसाई
Wednesday, 14 October 2020

आरटीईच्या 60 टक्के जागा रिक्तच, शाळा सुरू होण्याबाबत अनिश्चितता असल्याचा फटका 

बेळगाव  : शाळा वेळेत सुरू न झाल्याचा फटका आरटीई प्रवेश प्रक्रियेही बसला असुन आतापर्यंत आरटीईच्या 40 टक्‍के जागाही भरती झालेल्या नाहीत त्यामुळे आरटीई लागु झाल्यापासुन पहिल्यांदाच आरटीई प्रवेशाकडे पालकांनी मोठ्‌या प्रमाणात पाठ फिरविली आहे. त्यामुळे आरटीईच्या अनेक जागा रिक्‍त आहेत. 

यावेळी शिक्षण खात्याने आरटीई प्रवेशाबाबत सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नव्हता त्यामुळे 2020- 21 आरटीई प्रवेशाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होती. त्यानंतर शिक्षण खात्याने मार्चच्या सुरवातीला आरटीई प्रवेश प्रक्रियेला चालना दिली त्यानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले मात्र लॉकडाऊनमुळे प्रवेश प्रक्रियेला मोठा विलंब झाला त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या पालकांची चिंताही वाढली होती. तसेच त्यामुळे आरटीई प्रवेशाबाबत शिक्षण खात्याने वेळीच निर्णय घ्यावा अशी मागणी होत होती. ऑगस्ट महिन्यात शिक्षण खात्याने प्रवेश यादी जाहीर केली होती.

मात्र कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरु होतील याबाबत अनिश्‍चितता असल्याने यादीत नाव येऊन देखिल जागा भरती झालेल्या नाहीत त्यामुळे अनेक शाळात जागा रिक्‍त राहिल्या आहेत. शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळांमध्ये 25 टक्‍के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे आरटीई लागू झाल्यापासून लाखो विद्यार्थ्यांनी आरटीईच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

हेही वाचा-  उभी पिके झाली आडवी : निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी, अथणी, रायबागला दणका -

मात्र आरटीईतून दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवेशामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर सरकारने गेल्या वर्षीपासून आरटीईच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या कमी झाली असून नव्या नियमानूसार घराच्या परीघापासून दिड किलो मिटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा उपलब्ध नसेल तरच पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे आरटीईसाठी उपलब्ध असलेल्या शाळा व जागांची संख्या कमी झाली आहे. अशातच यावेळी अनेक पालकांनी जागा उपलब्ध असुनही प्रवेशाकडे पाठ फिरविल्याने येणाऱ्या काळात आरटीई प्रवेशाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा-  उभी पिके झाली आडवी : निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी, अथणी, रायबागला दणका -

शिक्षण खात्याने 2020- 21 च्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पालकांनी अर्ज केले होते त्यानंतर यादी जाहीर करण्यात आली होती. नव्या नियमामुळे शहरात आरटीईच्या जागा अतिशय कमी आहेत तसेच शाळांचीही संख्याही कमी झाली आहे. 
ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixty per cent of RTE seats are vacant a blow to the uncertainty about starting school