"शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव'; भाजपचाच नारा!

सिद्धार्थ लाटकर 
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

शिवेंद्रसिंहरजेंच्या उमेदवारीस विरोध करुन दिपक साहेबराव पवार यांच्या नावाने उमेदवारीचा ठराव साताऱ्यात झालेल्या मेळाव्यात केला. त्यास उपस्थितांनी घोषणा देत तसेच हात उंचावून मान्यता दिली. 

सातारा : शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपसाठी झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. त्यातूनच आज (गुरुवार) "शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव' ही भूमिका घेत सातारा विधासभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख व विविध पदाधिकाऱ्यांनी भाडोत्री उमेदवारी नहीं चलेगी अशा घोषणा देत शिवेंद्रसिंहरजेंच्या उमेदवारीस विरोध करुन दिपक साहेबराव पवार यांच्या नावाने उमेदवारीचा ठराव साताऱ्यात झालेल्या मेळाव्यात केला. त्यास उपस्थितांनी घोषणा देत तसेच हात उंचावून मान्यता दिली. 

या मेळाव्याच्या प्रारंभी सुधीर पवार यांनी मनोगत केले. ते म्हणाले सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपकडे उमेदवारचा चेहराही नव्हता. बूथ काय अगदी जिल्हा परिषदेच्या पातळीवरही पक्षाचे कोणतेच नेटवर्क नव्हते. या मतदारसंघातील कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे सदस्य नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजेच पयार्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात उभे राहण्याचे धाडसही कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत 2014 च्या निवडणुकीला दीपक पवार भाजपकडून सामोरे गेले. त्यांचा पराभव झाला; परंतु त्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये पक्षाच्या बांधणीला वेग दिला.

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या. दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभा मतदारसंघातील 427 बूथपर्यंत बूथप्रमुख व सदस्यांचे संघटन बांधले. काही दिवसांपुर्वी शिवेंद्रसिंहराजेंनी भाजप प्रवेश केला. हा प्रवेश देत असताना मतदारसंघातील कोणालाही विश्‍वासात घेतले नाही. विधानसभेत चकार शब्द न बोलणाऱ्यास, शेतकऱ्यांच्या सात बारावरील भवानी माता ट्रस्टचे शिक्के काढा असे सांगितले त्यावर त्यांनी माझे काम नाही "दादा'चे काम आहे असे म्हणणाऱ्यास पक्षात घ्यायचे का नाही असे उपस्थितांना विचारताच सर्वजण नाही म्हणून घोषणा देत होते. या मेळाव्यास मतदारसंघातील सर्व बूथचे पदाधिकारी, सदस्य, युवक व महिला उपस्थित होते. या मेळाव्यास भाजपचे माजी नगरसेवक सागर पावसे, गीता लाेखंडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slogans against Shivendrasinh Bhosale in satara by BJP Party workers