त्या चिमुरडीच्या खुनाचा आज उलगडा होणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

विठ्ठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील सात वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी कसुन तपास सुरू आहे. "एलसीबी'च्या पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.

तुंग, ता. 22 : येथील विठ्ठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील सात वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी कसुन तपास सुरू आहे. "एलसीबी'च्या पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. आज दिवसभरात काही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. तसेच गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून परिसरात चौकशी सुरू आहे. पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला असून वसाहतीला छावणीचे स्वरुप आले आहे.

सात वर्षांच्या चिमुरडीच्या बाबतीत घडलेल्या घटनेने गाव हादरले आहे. पोलिस तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. खुनाची घटना उघडकीस आल्यापासून गावात पोलिस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. खुनाचा प्रकार शेतात घडल्यामुळे परिसरातील शेतात काम करणारे कामगार तसेच गावातील काहीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही संशयितांना "होम क्वारंटाईन' करण्यावरून बुधवारी सायंकाळी वाद सुरू होता. तेव्हाच संधी साधून नराधमाने अत्याचार करून खून केल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. गुरुवारी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
आज दुसऱ्या दिवशी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश दंडिले यांच्यासह पोलिस निरीक्षक अनिल तनपूरे, एल.सी.बी.चे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने कसून तपास सुरू केला आहे. एलसीबीच्या पथकाने तिघा संशयितांना आज सकाळी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते. शनिवारी या गुन्ह्याचा छडा लागेल अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाचे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याची माहिती मिळताच हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज तुंग येथे भेट दिली. कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना आरोपीचा तत्काळ शोध घेऊन कडक शिक्षेसाठी प्रयत्न करा अशा सूचना केल्या. भाजपच्या नेत्या नीता केळकर, नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनीही कुटुंबीयांचे सांत्वन करत न्याय मिळवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. कॉंग्रेसच्या ऍड. मनीषा रोटे यांनीही मदतीचे आश्वासन दिले. 

भावाची साथ सोडली अन... 
नेहमी भावा बरोबर खाऊ आणण्यासाठी जाणारी चिमुरडी त्यादिवशी मात्र भावाला न घेता खाऊ आणायला गेली होती. नेमका त्याचवेळी नराधमाने डाव साधल्याचे चौकशीत पुढे आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That small girls murder mistry will be solved today?