स्मार्ट सिटी आणि मूलभूत सुविधा पुरविण्याचे आहे आव्हान

स्मार्ट सिटी आणि मूलभूत सुविधा पुरविण्याचे आहे आव्हान

राज्यातील इतर शहरे विकासाच्या मागे धावत असली, तरी सोलापूर शहरातील नागरिक मात्र 52 वर्षांनंतरही आवश्‍यक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यात आता स्मार्ट सिटीची भर पडली आहे. महापालिका स्थापनेवेळी 33 चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ आता 179 चौरस किलोमीटर झाले आहे. मिळकती, लोकसंख्या वाढली, नगरे वाढली; सुविधा मात्र अपेक्षित प्रमाणात झाल्या नाहीत. कोट्यवधी रुपयांचा कर भरूनही हद्दवाढ भागातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. आगामी निवडणुकीनंतर महापालिकेत महिला सदस्यांची संख्या ही पुरुष सदस्यांइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वार्थाने विकास करणे शक्‍य आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घेतल्यास सोलापूरकर पुन्हा सुवर्णकाळ अनुभवतील. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रत्यक्षात आणण्याचे मोठे काम महापालिकेसमोर आहे. त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि तो जाणीवपूर्वक मिळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ही निवड सोलापूरकरांसाठी आनंददायी असली तरी तितक्‍याच प्रमाणात पाठपुराव्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकालाही आपला परिसर स्वच्छ राहावा, अशी इच्छा झाली पाहिजे. महापालिका कर्मचाऱ्यांकडून चांगल्या कामांची अपेक्षा करतानाच त्यांनाही चांगल्या सुविधा मिळतील याची दक्षता घ्यावी. सुजाण नागरिकांची प्रभाग स्तरावर नियुक्ती झाल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
- तेजा कुलकर्णी, सेवानिवृत्त अधिकारी, महापालिका

नागरिकांनीच घ्यावा पुढाकार
मेघना सामलेटी : रस्ते व्हावेत. पाणीपुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. सध्या साफसफाईची तर काहीच सोय नाही. अधिकारी-कर्मचारी कधीच येत नाहीत. हा परिसर महापालिका हद्दीत येतो की नाही, अशी अवस्था आहे. नागरिकांना कराच्या बदल्यात मूलभूत सुविधा मिळत नाहीत. नगरसेवकांनीच आता पुढाकार घेऊन हद्दवाढ भागाचा विकास करावा.

मूलभूत सुविधा द्याव्यात
प्रा. संघमित्रा चौधरी ः मूलभूत सुविधा देणे हे पहिले काम शासनाने करणे अपेक्षित आहे. जितक्‍या जास्त मूलभूत सुविधा देता येतील, तितका सर्वसामान्यांवरचा ताण कमी होईल. रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छतागृह आणि महत्त्वाचे म्हणजे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे.

कर भरूनही सुविधा नाहीत
वनिता व्हटकर (गृहिणी) ः ड्रेनेजची सुविधा मिळायला हवी. कचरा उचलला जात नाही. अंतर्गत रस्ते खूपच खराब झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. महापालिका ही शहरासह हद्दवाढमधील नागरिकांकडूनही समान कर वसूल करते; मात्र सुविधा देत नाही. नियमित कर भरणाऱ्या करदात्यांची ही खंत आहे.

पाण्याचे नियोजन व्हावे
स्वाती आवारे : हद्दवाढ होऊन पंचवीस वर्षे होत आली, पण अद्याप पुरेशा सुविधा झालेल्या नाहीत. भविष्यात तरी आमच्या भागात सुविधा देण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल, ही अपेक्षा आहे. पाण्याचे नियोजन व्हावे असेही वाटते.
 

हद्दवाढ भागात सुविधा द्याव्यात
उषा कसबे : हद्दवाढमधील अनेक भागांत कोणत्याही सुविधा महापालिका पुरवीत नाही. कर मात्र नियमित वसूल केला जातो. रस्त्यांची अवस्था तर खूपच वाईट आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाचे लक्ष नाही. आजही हद्दवाढमधील बहुतांश परिसर खेड्यासारखा आहे. याचे प्रशासनाला काहीच वाटत नाही.
 

पाण्याचे योग्य नियोजन करावे
मनीषा उडाणशिव ः शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी पुरेशा टाक्‍या आहेत. पाण्याचे योग्य नियोजन करावे. पाणी कधी येणार याची खात्री नसल्याने महिलांच्या नियोजनाचा बोजवारा उडतो. पाण्याचे वेळापत्रक निश्‍चित करून त्या पद्धतीनेच पाणीपुरवठा केल्यास महिलांना त्रास होणार नाही.
 

घंटागाड्यांचे नियोजन हवे
मुमताज गौर ः शहरातील कचरा वेळेवर उचलला जावा. त्यासाठी घंटागाडीचे नियोजन करावे. वेळेत कचरा उचलला आणि त्याची वेळेत विल्हेवाट लावली तर आपले सोलापूर शहर खऱ्या अर्थाने स्वच्छतेबाबत "स्मार्ट‘ होण्यास मदत होईल.
 

प्लास्टिकमुक्तीसाठी धोरण राबवावे
आशा सदाफुले ः प्लास्टिकची समस्या सध्या भेडसावत आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवावी. प्लास्टिकमुळे घरगुती ड्रेनेज तुंबतात. त्यामुळे अनारोग्याची स्थिती निर्माण होते. प्लास्टिक खाल्ल्याने मुक्‍या जनावरांनाही त्रास होतो. प्लास्टिकमुक्तीसाठी कागदी पिशव्या किंवा इतर पर्यायांबाबत महापालिकेने जनजागृती करावी.
 

नेहमी व्हावी स्वच्छता
नाजीरा पठाण ः राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी शहर खऱ्या अर्थाने "स्मार्ट‘ दिसले. हीच कार्यवाही कायमस्वरूपी ठेवली तर शहर निश्‍चितच स्वच्छ व सुंदर दिसेल. हद्दवाढ भागात ड्रेनेज व रस्त्यांची सुविधा पुरवावी. कचरा रोजच्या रोज उचलावा. त्यामुळे रोगराई पसरणार नाही.
 

कृपावती करसंकुल ः सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला ही अभिमानाची गोष्ट आहे. मूलभूत सुविधांबरोबरच उद्योग-व्यवसाय सुरू झाले तर स्थानिक युवकांना रोजगारासाठी बाहेरील जिल्ह्यांत जावे लागणार नाही. त्यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत राहता येईल. शहराच्या विकासामध्ये योगदान देता येईल. असे झाल्यास शहर खऱ्या अर्थाने "स्मार्ट‘ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com