फटाक्‍यांचा धूर कोरोनामुक्तांना घातक;  दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची भीती कायम

Smoke from firecrackers is harmful to coronaviruses; Fear of another wave after Diwali persists
Smoke from firecrackers is harmful to coronaviruses; Fear of another wave after Diwali persists

सांगली : तब्बल दोन महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णसंख्येचा एका दिवसाचा आकडा दोनशेपेक्षा कमी झाला आहे. ही समाधानाची बाब असली तरी या घडीला दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल का, या भितीने प्रशासन अस्वस्थ आहे. या भितीचा लवलेश बाजारात कुठेही दिसत नसून "कोरोना संपला', अशा अविर्भावात लोक वावरत आहेत.

दुसरीकडे दसरा आणि दिवाळीत फटाके मुक्तपणे वाजवले गेले तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ते घातक ठरू शकते, अशी भिती कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळी हे दोन्ही सण कमीत कमी गर्दीत, फटाकेमुक्त पद्धतीने साजरे करणे हाच पर्याय आहे. 

\जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 42 हजार 858 हून अधिक आहे. 1576 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, बेड यासाठी जो काही संघर्ष झाला, तो साऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. आता परिस्थिती कुठेतरी आटोक्‍यात येताना दिसते आहे. रविवारी 126 रुग्ण बाधित आढळले. गेल्या दोन महिन्यात सरासरी एक हजाराची संख्या दिसत होती. ती आता नियंत्रणात आली याचे समाधान व्यक्त करतानाच समोर मोठए संकट दिसत असल्याने प्रशासन पूर्ण धास्तावलेले आहे.

खरे तर दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण, मात्र, तो कोरोनाची दुसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल की काय, अशी भिती आहे. या काळात खरेदीसाठी झुंबड उडणे, प्रचंड गर्दी होणे, हे टाळावे लागणार आहे. सध्याची आठवडा बाजारांची स्थिती, ओसंडून वाहणारी गर्दी पाहता लोक ऐकतील का ? याबाबत खात्री देता येत नाही. हे संकट पुन्हा एकदा वैद्यकीय नगरीची परीक्षा पाहू शकते. जगात अशा दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. ती पहिल्या लाटेपेक्षा अधिक आव्हानात्मक असू शकते. 

या स्थितीत फटाके वाजवणे हे कोरोनामुक्त रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखे ठरेल, अशी भिती डॉ. संजय साळुंखे यांनी व्यक्त केली. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची फुफुसे कमकुवत झाली आहेत. त्यांची श्‍वासोच्छवास क्षमता कमी झाली आहे. अशावेळी सामान्य माणसाला त्रासदायक ठरणारा फटाक्‍यातील दारुचा धूर या रुग्णांना जीवघेणाही ठरू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तो सहन होणार नाही, अशी भिती आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने करावी, फटाके मुक्त करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

गणेशोत्सवानंतर लाट 
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कधी वाढली आणि का, याची कारणमीमांसा करताना गणेशोत्सवातील ढिलाईचे कारण स्पष्टपणे समोर येते. या काळात बहुतेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव टाळला गेला, घरीच उत्सव झाला, मात्र त्यानंतरही लाट आली. एकेका दिवशी एक हजार ते अकराशे रुग्ण बाधित आढळले. हे का झाले ? अर्थातच, उत्सव साधेपणाने झाला असला तरी गर्दी टाळली गेली नाही, हे वास्तव लपणार नाही.  

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com