Video : बापरे! माणसाच्या पोटात चक्क 12 जिवंत गोगलगायी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

करंडी (ता. सातारा) येथील सुमारे 80 वर्षाच्या रुग्णाच्या पोटात दहा ते 12 जीवंत गोगलगाई आढळल्या आहेत. या रुग्णावर साताऱ्यातील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.

सातारा : करंडी (ता. सातारा) येथील सुमारे 80 वर्षाच्या रुग्णाच्या पोटात दहा ते 12 जीवंत गोगलगाई आढळल्या आहेत. या रुग्णावर साताऱ्यातील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.

करंडी (ता. सातारा) येथील 80 वर्षांच्या रुग्णास 16 ते 17 वेळा जुलाब झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाही जुलाब होतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या शौचातून चार शिंपल्यासारखे दिसणारे काही तरी बाहेर आले. तो प्रकार काही तरी वेगळा वाटला म्हणून बाजूला ठेवले आणि निरीक्षण केले. तर त्या चक्क गोगलगाई होत्या. परंतु, असे काही होऊ शकते, शौचातून जीवंत गोगलागाई कशी निघू शकतात, अशी शंका डॉक्‍टरांना आली. त्या गोगलगाईच आहेत याची पुर्ण खात्री झाल्यावर डॉ. विक्रांत महाजनी यांनी रुग्णाच्या पोटाची सोनोग्राफी करण्याची सूचना केली. त्यानुसार डॉ. अमिता महाजनी यांनी रुग्णाच्या पोटाची सोनोग्राफी केली. त्यात संबंधित रुग्णाच्या पोटातील आतड्यांमध्ये हालचाल करणारी वस्तू किंवा किडा आहे, असे आढळले. त्याची संख्या दहा ते बाराच्या दरम्यान दिसत होती. त्यानंतरही रुग्णाच्या शौचाच्या वाटेतून गोगलगाई बाहेर येत होत्या. 

गोगलागाईमुळे या रुग्णाच्या आतड्यात विषबाधा झाली आहे. त्याचा परिणाम किडणीवर झाला आहे. याला वैद्यकीय शास्त्रात इंटरस्टीशियल नेफ्रीटीस असे संबोधिले जाते. त्यामुळे त्यांचे डायलिसिस करावे लागले. अजूनही त्यांच्या शौचाद्वारे गोगलगाई बाहेर पडत आहेत. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने ही एक आश्‍चर्यकारक गोष्ट आहे. डॉ. विक्रांत व डॉ. अमिता महाजनी यांनी त्या रुग्णास सर्व पद्धतीने मदत करुन सहकार्य सुरु ठेवले. संबंधित रुग्णावर उपचार सुरू असून त्यांची तब्येत सुधारत असल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snails in 80 years old man s stomach at satara

टॅग्स