साप मारून फोटो फेसबुकवर "शेअर' केला...अन्‌ गुन्हा दाखल झाला...कडेगाव तालुक्‍यात घडला प्रकार 

संतोष कणसे
Wednesday, 15 July 2020

कडेगाव (सांगली)-  साप मारून फेसबुकवर फोटो व्हायरल करणे शिवणी (ता.कडेगाव) येथील मारुती कृष्णत खराडे (वय-20) तरुणाला चांगलेच महागात पडले. याबद्दल कडेगाव वनक्षेत्रपाल कार्यालयाने त्याला ताब्यात घेवून त्याचेवर कारवाई केली.

कडेगाव (सांगली)-  साप मारून फेसबुकवर फोटो व्हायरल करणे शिवणी (ता.कडेगाव) येथील मारुती कृष्णत खराडे (वय-20) तरुणाला चांगलेच महागात पडले. याबद्दल कडेगाव वनक्षेत्रपाल कार्यालयाने त्याला ताब्यात घेवून त्याचेवर कारवाई केली.

 कडेगाव वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कडेगाव तालुक्यातील शिवणी गावातील तरुण मारुती कृष्णत खराडे याने (ता.11 ) आपल्या मळ्यातील शेडजवळ धामण जातीच्या एका सापाला काठीने मारून त्याच्या बरोबर काढलेला फोटो फेसबुकसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज पहाटे सहा वाजता शिवणी गावातून वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर,वनपाल राजेश पाटील,वनरक्षक अनिल कुंभार,रवींद्र कोळी,अभिजित कुंभार यांचेसह कडेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने आरोपी मारुती खराडे याला आज चौकशीसाठी ताब्यात घेतले.चौकशीनंतर संशयित आरोपी खराडे याला कडेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष हजर करण्यात केले. सदर कारवाई ही सांगली येथील सहाय्यक वनसंरक्षक गजानन चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कार्यालय कडेगाव- पलूस मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पार पडली.
दरम्यान खराडे याने मारलेला साप वनविभागाने ताब्यात घेऊन सापाला वन क्षेत्रात दहन केले. 

नागपंचमी उत्सवाच्यानिमित्ताने कडेगाव व पलूस भागामध्ये जर कोणी अघोरी प्रथा पाळण्यासाठी सापांना पकडण्याचे गैरकृत्य करताना आढळल्यास नागरिकांनी 1926 या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- मदन क्षिरसागर,वनक्षेत्रपाल कडेगाव-पलूस

 

संपादन : घनशाम नवाथे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake killing photo "shared" on Facebook .crime was registered . What happened in Kadegaon taluka