...म्हणून राहुरीला मंत्रिपद दिले : शरद पवार 

... So Rahuri is given the Cabinet: Sharad Pawar
... So Rahuri is given the Cabinet: Sharad Pawar
Updated on: 

नगर : "राज्यात मंत्रिपदे देताना नगर जिल्ह्याचा आम्ही वेगळा विचार केला. ज्या तालुक्‍याला मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती, त्यांना दिली आहे. अन्य तालुक्‍यांना मंत्रिपदे मिळाली होती. राहुरीलाच यापूर्वी ते मिळाले नसल्याने आम्ही या तालुक्‍यात मंत्रिपद दिले,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""नगर जिल्ह्याचे उत्तर-दक्षिण मला माहीत नाही. आम्ही सर्वांना न्याय दिला आहे. त्यामुळे नाराज कोणीही नाही. नगर जिल्ह्यात नवीन पिढी आणण्याचा प्रयत्न केला. नव्या पिढीला कामही खूप देणार आहोत. राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने, प्रत्येकाकडे पाच-सहा खाती द्यावी लागतील. मला हे माहीत आहे, की अकोल्याला यापूर्वी मंत्रिपद मिळाले होते, कोपरगावलाही मिळाले, राहात्यालाही कोणी तरी होते, असे लक्षात आले. श्रीरामपूरलाही कोणी तरी मंत्री होते. नगर शहरालाही मंत्री मिळाले होते. श्रीगोंदे हे बारामतीच्या जवळच आहे, तेथेही मंत्री होते. हे सर्व पाहताना मला फक्त राहुरीच मोकळी दिसली. आता काही जास्त सांगायची गरज नाही!'' 

सर्वच म्हणतात "गृह खाते नको' 
""मंत्री झाल्यानंतर खातेवाटप करताना प्रत्येक वेळी दोन दिवस लागतातच. मी मंत्री होतो, त्या वेळीही नंतर खातेवाटप व्हायचे. एका पक्षाचे सरकार असताना असे व्हायचे; आता तर तीन पक्ष आहेत. सुदैवाने या तिन्ही पक्षांमध्ये कोणती खाती द्यायची, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. आता फक्त संबंधित पक्षनेत्यांनी त्या-त्या मंत्र्यांना खाती द्यायची आहेत.

महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. "राष्ट्रवादी'तही कोणी नाराज नाही. उलट मी अनेकांना, गृह खाते हवे का, अशी विचारणा केली; परंतु कोणीच तयारी दर्शविली नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. आज किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री खातेवाटपाचा निर्णय जाहीर करतील.''  

महाआघाडीसाठी अन्य राज्यांतही पुढाकार घेणार : पवार 
""महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणा झाली आहे. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे. त्यासाठी लवकरच सर्व राज्यांतील समविचारी पक्षांची बैठक घेणार आहोत,'' असे शरद पवार यांनी आज सांगितले. 

पवार म्हणाले, ""झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे अभिनंदन करताना एके ठिकाणी म्हटले होते, "महाराष्ट्रात शरद पवार यांनी जो महाआघाडीचा निर्णय घेतला, त्याने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.' लोकांना पर्याय हवा आहे; परंतु कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असा विश्‍वास लोकांमध्ये व जाणकारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच लोक महाराष्ट्राकडे बघत आहेत. ममता बॅनर्जी यांनीही मला पत्र पाठवून, आम्ही सर्वांची बैठक घ्यावी, असे म्हटले आहे. बघू, या संदर्भात काय करता येईल? त्यासाठी सर्वांशी चर्चा करणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Sugarcane Price Protest
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Marathi News Esakal
www.esakal.com