पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारात सोलापूरकर मागे 

solapur have not proper system of graveyard
solapur have not proper system of graveyard

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात काही गोष्टी सकारात्मक घडत असल्यातरी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीचा अपेक्षित वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूरला ग्रीन सिटी करण्यासाठी एकीकडे लाखो वृक्षांची लागवड होत असतानाच अंत्यसंस्कारासाठी दररोज हजारो टन लाकडांचा वापर होत आहे. जवळपास 12 लाख लोकसंख्येच्या सोलापुरात एकच विद्युत दाहिनी कार्यरत असून एका वर्षात फक्त 412 मृतदेहांवर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

विकासाच्या दिशेने निघालेल्या इतर शहरांच्या मानाने सोलापूर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारात खूपच मागे आहे. सोलापुरात सर्वच स्मशानभूमीत पारंपारिक पद्धतीने भडाग्नी देवून अंत्यसंस्कार केले जात आहेत. मोदी परिसरातील मोरे स्मशानभूमीत असलेल्या विद्युत दाहिनीचा वापर वाढविण्याबाबत महापालिकेची उदासिनता दिसून येत आहे. 2016 मध्ये रोटरी क्‍लबने अक्कलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्याची तयारी केली होती, मात्र काही कारणास्तव तो विषय मागे पडला. बाळे जुना पुना नाका परिसरातील स्मशानभूमीतील गेल्या अनेक वर्षांपासून डिझेलची दाहिनी बंद अवस्थेत धूळखात पडून आहे. महापालिका प्रशासनाने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी तसेच वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत दाहिनीच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. 

आकडे बोलतात.. 
- शहराची लोकसंख्या जवळपास - 12 लाख 
- शहरात विद्युत दाहिनी - 1 
- महिन्याला सरासरी मृत्यू - 1 हजार 
- विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार - 34 
- लाकडाद्वारे अंत्यसंस्काराचा खर्च : 5 हजार 
- विद्युत दाहिनीतील खर्च : 300 रुपये 

याचाही विचार करा.. 
एका अंत्यसंस्कारासाठी 7 ते 10 मण (एक मण म्हणजे 40 किलो) लाकूड जाळले जाते. बहुतांशवेळी अंत्यसंस्कारासाठी फक्त लाकडेच नाही तर गोवऱ्यांचाही वापर होतो. काहीजण चिता पेटविण्यासाठी तुपाचा वापर करतात तर काहीजण परिस्थितीनुसार रॉकेलही टाकावे लागते. मुस्लिम आणि पारशी धर्मीयांव्यतिरीक्त अन्य धर्मीयांचे अंत्यसंस्कार दहन करून केले जातात. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागत आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कराची संकल्पना आता साऱ्यांची स्वीकारण्याची आवश्‍यकता आहे. 

हे महत्वाचे.. 
- सर्वच स्मशानभूती विद्युत दाहिनी उभारावी. 
- नगरसेवक, आमदार आणि खासदारांनी निधी द्यावा. 
- पर्यावरण संवर्धनासाठी साऱ्यांनीच पुढे यावे. 
- विद्युत दाहिनीबाबत जनजागृती व्हावी. 
- अंत्यसंस्काराची प्रक्रिया सोपी करावी. 
- प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक. 

आमचे वडील (स्व.) वृक्षमित्र बाबूराव पेठकर यांच्या निधनानंतर अनेकांनी शेतात अंत्यसंस्कार करण्याबाबत सुचविले, पण आम्ही पर्यावरण संवर्धनाचा विचार करून विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले. सोलापूरकरांनी आपली मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने डॉक्‍टर सर्टिफिकेटची अट आणि इतर किचकट प्रक्रिया कमी करावी. 
- डॉ. यशवंत पेठकर, पर्यावरणप्रेमी 

सोलापूर स्मार्ट सिटी होत असताना शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीची आवश्‍यक आहे हे मान्य आहे. महापालिका प्रशासन याबाबत सकारात्मक विचार करेल. पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत दाहिनीचा वापर वाढलाच पाहिजे. जनजागृतीसाठी विविध सामाजिक संस्थांची बैठक घेता येईल. बाळे स्मशानभूमीतील डिझेल दाहिनी तांत्रिकी अडचणीमुळे बंद आहे. 
- संदीप कारंजे, नगर अभियंता, सोलापूर महापालिका 

वास्तविक पाहता दशक्रिया विधीवेळी सर्व संस्कार केले जातात, त्यामुळे धर्मशास्त्राचा विचार करता विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यास अडचण नाही. चिता रचून अंत्यसंस्कार करण्याच्या तुलनेत विद्युत दाहिनीतील अंत्यसंस्काराला खर्च कमी येतो. सोलापूरकरांनी विद्युत दागिनीमध्ये अंत्यसंस्काराचा पर्याय स्वीकारायला हवा. याबाबत जनजागृती आवश्‍यक आहे. 
- ओंकार दाते, धर्म शास्त्राचे अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com