सोलापुरात माथाडी कामगारांच्या बंदमुळे कांद्याचे लिलाव बंद 

सुदर्शन सुतार
मंगळवार, 2 जानेवारी 2018

-भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद, शेतकऱ्यांतून संताप 
-माल उतरला नसल्याने गाड्या थांबून, शेतकऱ्यांचा रास्ता रोको 
-चर्चेच्या फेऱ्यानंतर माल उतरला, पण लिलाव ठप्प 

सोलापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.2) बाजार समितीत तणाव निर्माण झाला.

मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली. विशेषतः कांद्याच्या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला. गाड्या उतरल्या न गेल्याने बाजार समितीत गाड्या रस्त्यावरच थांबून राहिल्या. सकाळपर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीचे कार्यालय गाठून ठिय्या मारला. कामगारांची काम न करण्याची भूमिका आणि शेतकऱ्यांची लिलाव करण्याची मागणी यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. अखेरीस माल उतरला गेला, पण कांद्याचे लिलाव मात्र होऊ शकले नाहीत. 

भीमा-कोरेगावातील घटनेचे सोलापुरात तीव्र पडसाद उमटले. मध्यरात्रीपासूनच बाजारात फळे व भाजीपाला, कांद्याची आवक सुरु होते. सकाळपर्यंत फळे व भाजीपाल्याची आवक आणि त्याचे व्यवहारही पार पडले. पण पहाटेपासून कांद्याच्या गाड्यांची आवक सुरु झाली, तेव्हा हमालांनी अचानकपणे या घटनेच्या निषेधार्थ माल उतरण्यास नकार दिला. त्यावेळी शेतकऱ्यांची गोची झाली. त्यावेळी व्यापाऱ्यांनीही हमालांची समजूत काढली. पण माथाडी कामगार संघटना ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. तोपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास 250 ते 300 गाड्या आवारात येऊन थांबल्या होत्या. हमालांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मग थेट बाजार समितीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. तिथे बाजार समितीचे सचिव विनोद पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी माथाडी कामगार संघटनांशीही चर्चा केली. पण कोणीच ऐकत नव्हते. एकीकडे शेतकरी आणि एकीकडे कामगार अशा दुहेरी प्रश्‍नाला प्रशासन सामोरे गेले. पण मार्ग निघत नसल्याने वातावरण चिघळत चालले. दरम्यान, पोलिसांची कुमूक मागवण्यात आली. सहायक आयुक्त शर्मिष्ठा घार्गे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. पुन्हा पोलिस आणि कामगार संघटना यांच्यात चर्चेची फेरी झाली, तरीही आंदोलनावर कामगार संघटना ठाम राहिल्याने शेतकरीही संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीच्या समोर सोलापूर-हैदराबाद महामार्गावर रस्ता रोको केला. या सगळ्या गोंधळामध्ये माल मात्र तसाच पडून राहिला. कांद्याच्या लिलावाची दहाची वेळ आली, पण कामगार काही केल्या मागे हटेनात, पुन्हा चर्चेची फेरी सुरु झाली.

प्रशासनासह व्यापाऱ्यांनीही भीमा-कोरेगावच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची तयारी दर्शवली, शेवटी कामगार संघटना मागे हटल्या, माल उतरण्यास संमती दिली. पण तोपर्यंत बराचसा वेळ गेल्याने कांद्याचे लिलाव मात्र होऊ शकले नाहीत. 
 
कांद्याची 325 गाड्यांची आवक 

मंगळवारी बाजार समितीच्या आवारात जवळपास 325 गाड्यांची आवक झाली. पण कामगारांच्या या बंदमुळे लिलाव न झाल्याने व्यवहार ठप्प होते. बाजार समितीच्या आजच्या एका दिवसातील किमान 6 ते 7 कोटी रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली. दुपारनंतर पुन्हा दुसरी आवक सुरु झाल्याने भुसार बाजारात आहे तो कांदा उतरण्याची सोय बाजार समितीला करावी लागली. 

भीमा-कोरेगावच्या घटनेचा आम्हीही निषेधच करतो. आम्ही सर्वजण काळ्या फिती लावून काम करण्याची तयारी दाखवली, पण शेतकऱ्यांची अडवणूक नको, अशी भूमिका घेतली. पण कामगार ऐकत नव्हते, पण चर्चेतून विषय मार्गी लागला. आता आजचे व्यवहार उद्या पूर्ण होतील, बाजार समितीने त्यासाठीची तयारी केली आहे. दूरवरुन आलेल्या शेतकऱ्यांच्या जेवणाचीही अल्पदरात सोय केली आहे. 

-विनोद पाटील, प्रभारी सचिव, सोलापूर बाजार समिती, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news: agitation