पहिल्या दिवशी गणवेशाची परंपरा खंडित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

आजपासून शाळा होणार सुरू; सरकारकडून अद्यापही नाहीत गणवेशाचे पैसे

आजपासून शाळा होणार सुरू; सरकारकडून अद्यापही नाहीत गणवेशाचे पैसे
सोलापूर - राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा उद्यापासून (गुरुवार) सुरू होत आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी मोफत पुस्तके शाळांमध्ये उपलब्ध झाली आहेत. मात्र, पैशाअभावी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देता येणार नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेली पहिल्या दिवशी गणवेश देण्याची परंपरा यंदाच्या वर्षी खंडित होणार आहे. सरकारने पैसेच दिले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणार नाहीत.

सरकारी योजनांचा लाभ देताना लाभाच्या वस्तू खरेदी करू न देता त्याचे पैसे थेट संबंधित नागरिकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय डिसेंबरमध्ये घेतला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पुस्तके दिली जातात. मात्र, यंदाच्या वर्षी गणवेशाचे पैसे संबंधित विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या खात्यावर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

उद्यापासून (गुरुवार) शाळा सुरू होत आहेत. मात्र, अद्यापही सरकारने गणवेशाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे गणवेशाविना विद्यार्थी उद्यापासून शाळेत येणार आहेत. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेश देण्याची परंपरा यंदा सरकारच्या निष्क्रियतेमुळे खंडित झाली आहे.

राज्यात जवळपास 50 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर पैसे जमा केले जात होते. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी करून त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करत होती. आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेश खरेदी करायचे आहेत. त्याची पावती शाळेच्या मुख्याध्यापकाला दाखवायची आहे. मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थ्याला गणवेश घेतल्याची खात्री केल्यानंतर विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त खात्यावर गणवेशाचे चारशे रुपये जमा करायचे आहेत. मात्र, सरकारने अद्यापही पैसेच दिले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणे दुरापास्त झाले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके व गणवेश विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. गणवेशाचे पैसे अद्यापही आले नाहीत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात एखादा गणवेश खरेदी करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्याचे वाटप करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. पैसे येताच ते त्वरित शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा केले जातील.
- सुलभा वठारे, प्रभारी शिक्षणाधिकारी, सोलापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news no uniform for student at first day