अरणला हवा "अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा 

राजाराम कानतोडे
शनिवार, 22 जुलै 2017

सोलापूर - संत सावता माळी महाराज यांचा वारसा जपणाऱ्या अरण गावाला "अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, कृषी विद्यापीठ व्हावे आणि वनौषधींचे संशोधन केंद्र स्थापन करावे, अण्या मागण्या ग्रामस्थ करीत आहेत. 

सोलापूर - संत सावता माळी महाराज यांचा वारसा जपणाऱ्या अरण गावाला "अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, कृषी विद्यापीठ व्हावे आणि वनौषधींचे संशोधन केंद्र स्थापन करावे, अण्या मागण्या ग्रामस्थ करीत आहेत. 

संतशिरोमणी सावता महाराज यांची शनिवारी (ता. 22) 722वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त परंपरेप्रमाणे पंढरपुरातील श्रीविठ्ठलाची पालखी अरणमध्ये आली आहे. सावता महाराज यांनी नित्यनेमाने वारी केल्याचा उल्लेख आढळत नाही, मात्र त्यांच्या पुण्यतिथीला आषाढ वद्य चतुर्दशीला श्रीविठ्ठलाची पालखी अरणला येते. त्या दिवशी भरणारी अरणची काला यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेतील दहिहंडी फोडण्याचा मान पंढरपुरातील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वंशजांकडे आहे. 

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंबपासून चार किलोमीटरवर अरण आहे. एकेकाळी लाल मिरचीसाठी प्रसिद्ध या गावात आज बोर आणि डाळिंब पिकविणारे शेतकरी प्रख्यात आहेत. शेतीला बक्कळ पाणी नाही. नदी किंवा कालव्याचा आधार नसल्याने सगळे क्षेत्र विहीर आणि बोअरवर भिजते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी बागांना ठिबक सिंचन केले आहे. 

संत सावता महाराज यांना 45 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी कर्तव्यकर्माचा आणि नामसंकिर्तनाचा मार्ग अनुसरला. आपल्या हृदयात श्रीविठ्ठलाला जागा दिली, अशी आख्यायिका गावातल्या लहानथोरांना माहीत आहे. आता अरणचा समावेश तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात झाला आहे. त्याद्वारे काही कामे झाली. मंदिरासमोर दोन मजली यात्री निवास झाले. श्रीविठ्ठलाची पालखी मुक्कामाला असते, त्या शिंदे वाड्याचा विकास करण्यात आला. गावाअंतर्गत रस्ते सिमेंटचे आहेत. गावात दोन छोटेखानी अन्नछत्र मंडळे आहेत. सभामंडपाचे काम झाले आहे. सावता महाराज ज्या घरात राहात तिथे त्यांचे स्मारक उभारले आहे. 

सावता महाराज यांचे मूळ मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याला लागूनच असलेली शेती ते करीत. संजीवन समाधीची मूर्ती मंदिरात आहे. मंदिराला लागूनच सावता महाराज आपल्या अभंगात लिहितात ती विहीर आहे. ज्या विहिरीवर त्यांनी मळा फुलविला, ती आज गावकऱ्यांची तहान भागवित आहे. सावता महाराज यांना मुलगी होती. तिच्या बाजूने असणारे त्यांचे वंशज रमेश वसेकर आणि दामोदर वसेकर मंदिरात पुजारी आहेत. श्री संत सावता माळी देवस्थान ट्रस्ट आहे. त्याद्वारे सावता महाराज यांचे छोटेखानी गोष्टीरूप चरित्र, उपलब्ध अभंग आणि सावता महात्म्य या पुस्तकांची विक्री होते. या अगोदर पुण्यातील मा. गो. डोमाळे यांना पुस्तक प्रकाशनाचे काही हक्क होते. त्यांनी ते ट्रस्टला दिले आहेत. 

समाजजागृतीसाठी दरवर्षी सावता परिषदेच्या वतीने मेळावा होतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दोन कोटींचा निधी दिला आहे. भक्तांच्या सेवेसाठी आम्ही आमचे आयुष्य वाहून घेतले आहे. 
- रमेश वसेकर, पुजारी, संत सावता महाराज यांचे सतरावे वंशज. 

Web Title: solapur news Saint Sawata Mali Maharaj Pilgrimage