esakal | शिवसेनेच्या दहा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची पक्षाकडून मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Shivsena Demands for cancellation of ten Shiv Sena councilors Post

- सोलापुरातील कोठे-शेजवालसह दहाजणांचे नगरसेवकपद रद्द करा
- विभागीय आयक्तांकडे शिवसेनेने केले अपील दाखल 

शिवसेनेच्या दहा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची पक्षाकडून मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याबद्दल महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे व नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह त्यांच्या दहा समर्थकांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्या महापालिकेतील 19 नगरसेवकांना शहर प्रमुख हरि चौगुले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. महापालिकेत शिवसेनेचे 21 नगरसेवक आहेत, त्यापैकी 19 जणांनी श्री. कोठे
यांचा प्रचार केला होता, तथापि नोटीस बजावल्यानंतर सात नगरसेवकांनी आपण फक्त उमेदवारीचा निर्णय होईपर्यंत त्यांच्यासमवेत होतो, असा खुलासा केला आहे. त्यामुळे या सात नगरसेवकांव्यतिरीक्त इतर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने कोठे यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोठे यांनी बंडखोरी केली व निवडणूक
लढवली. त्याचा फटका बसून शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी झाली आणि त्याचा फायदा होऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या. धक्कादाक म्हणजे माने यांच्यापेक्षा कोठे यांना जास्त मते मिळाली. माने यांना 29 हजार 247 तर कोठे यांना 30 हजार 81 मते मिळाली.

शेजवाल यांनी मोहोळ मतदारसंघातून शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांच्या विरोधात बंडखोरी केली. शेजवाल यांना 3 हजार 822 मते मिळाली, तर क्षीरसागर यांना 68 हजार 833 मते मिळाली. तथापि क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी कॅंाग्रेसचे यशवंत माने यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करू नये, असा व्हीप बजावण्यात आला. मात्र तरीही विरोधात काम केले. 

सोलापूर विकास आघाडी सेना या गटाच्या स्थापनेसंदर्भात अर्ज देणे आणि शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध काम केल्याप्रकरणी कोठे व शेजवाल यांच्यासह देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, विठ्टल कोटा, अमोल शिंदे, उमेश गायकवाड, कुमुद अंकाराम, मंदाकिनी पवार, सुमित्रा सामल व मीरा गुर्रम या दहाजणांचे नगरसेवकपद
रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

कारवाई झाल्यास पुढील धोरण ठरवू : कोठे
आमच्यावर कारवाई करण्याबाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जी कारवाई सुरु आहे, त्याची कल्पना मातोश्रीला नसावी. विधानसभेची उमेदवारी मलाच आहे
असे अखेरपर्यंत सांगण्यात आले, इतकेच नव्हे तर उमेदवारी मला दिल्यासंदर्भातली माझी स्वाक्षरीह तेथील नोंदवहीत घेण्यात आली आहे. तरीही पक्षाने कारवाई केल्यास
त्यानंतर धोरण ठरवू, असे श्री. कोठे यांनी सांगितले. ते म्हणाले, "आम्हाला पक्ष सोडायचा नाही, मात्र श्रेष्ठींना कारवाई करायची असेल तर त्यांनी ती करावी."

loading image
go to top