हॉटेल व्यवस्थापकाचा खून करुन वस्ताद फरार ! सोलापूर- तुळजापूर रोडवरील घटना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

घटनेतील ठळक मुद्दे... 

  • सोलापूर- तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील सौरभ हॉटेलच्या व्यवस्थापकाचा वस्तादने केला खून 
  • शनिवारी (ता. 11) मध्यरात्री खून करुन पश्‍चिम बंगालचा वस्ताद पसार 
  • सफाई करण्यास आलेल्या कर्मचाऱ्याने दोघेही हॉटेलमध्ये नसल्याची माहिती हॉटेल मालकास दिली 
  • हॉटेल मालकाने हॉटेल परिसरात पाहिल्यानंतर व्यवस्थापक कैलास परबळकर (वय 50) यांचा खून झाल्याचे उघड 
  • तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल; पोलिसांनी सुरु केला आरोपीचा शोध 

सोलापूर : तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे व्यवस्थापक कैलास आप्पाराव परबळकर (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ) यांचा खून करुन आरोपी वस्ताद आकाश मंडल (रा. पश्‍चिम बंगाल) पसार झाला आहे. पोलिसांनी आकाशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 11) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर- तुळजापूर रोडवरील हॉटेल सौरभमध्ये कैलास परबळकर हे सात वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. 23 मार्चपासून राज्यात लॉकडाउन असल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. वस्ताद आकाश हा त्याच ठिकाणी राहण्यास होता. दरम्यान, 13 जूनपासून हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, हॉटेलमधील जेवण विभाग बंदच ठेवून पार्सल दारुची सोय त्याठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे परबळकर हे त्याच ठिकाणी मुक्‍कामी असायचे. शनिवारी वस्ताद आकाश आणि परबळकर जेवण करुन हॉटेलमध्ये झोपले. रविवारी (ता. 12) सकाळी सफाई करण्यासाठी कामगार आला असता त्याला दोघेही त्याठिकाणी दिसले नाहीत. त्यावेळी त्यांनी हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोनवरुन माहिती दिली. मालक गुल्लापल्ली यांनी तत्काळ हॉटेल गाठले आणि आजूबाजूला पाहणी केली. त्यावेळी परबळकर यांचा खून करुन त्यांचे प्रेत हॉटेलच्या मागे टाकण्यात आल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी तालुका पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. आकाश मंडलने हॉटेल व्यवस्थापक परबळकर यांचा खून का केला, याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

घटनेतील ठळक मुद्दे... 

  • सोलापूर- तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील सौरभ हॉटेलच्या व्यवस्थापकाचा वस्तादने केला खून 
  • शनिवारी (ता. 11) मध्यरात्री खून करुन पश्‍चिम बंगालचा वस्ताद पसार 
  • सफाई करण्यास आलेल्या कर्मचाऱ्याने दोघेही हॉटेलमध्ये नसल्याची माहिती हॉटेल मालकास दिली 
  • हॉटेल मालकाने हॉटेल परिसरात पाहिल्यानंतर व्यवस्थापक कैलास परबळकर (वय 50) यांचा खून झाल्याचे उघड 
  • तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल; पोलिसांनी सुरु केला आरोपीचा शोध 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur-Tuljapur road murder of a hotel manager